आॅनलाईन फ्रॉड वाढले
By admin | Published: December 30, 2016 04:32 AM2016-12-30T04:32:28+5:302016-12-30T04:32:28+5:30
माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून देशात कॅशलेस व्यवहार सुरु करण्याचे केंद्र शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. नोटाबंदीनंतर याबाबत मोठ्या प्रमाणावर जाहिरात करण्यात येत
पुणे : माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून देशात कॅशलेस व्यवहार सुरु करण्याचे केंद्र शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. नोटाबंदीनंतर याबाबत मोठ्या प्रमाणावर जाहिरात करण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाने थेट अॅपही सुरु केले आहेत. परंतु या कॅशलेस व्यवहारांमधून आॅनलाईन फ्रॉड होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नोटाबंदीपासून ५0 दिवसांमध्ये अशा शेकडो तक्रारी सायबर गुन्हे शाखेकडे दाखल झाल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी रात्रीपासून पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटा चलनामधून बाद केल्या. या निर्णयाचे देशभरात स्वागत करण्यात आले तसाच मोठ्या प्रमाणावर विरोधही झाला. वेळोवेळी नवनवीन नियम सांगतानाच कॅशलेस व्यवहार करण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले. परंतु कॅशलेस व्यवहार सर्वसामान्य आणि गोरगरिबांना जमणार का हा प्रश्न आहे.
जेथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सुशिक्षितांनाच कोट््यवधी रुपयांचा गंडा घालण्यात येत आहे, तेथे गोरगरीब अशिक्षितांचा निभाव कसा लागणार हा प्रश्न आहे. पुण्यासारख्या प्रगत शहरामध्येही सायबर गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. पोलिसांकडे वर्षाला दाखल होणाऱ्या तक्रारींचे प्रमाण लक्षणीय आहे. पोलिसांकडून या तक्रारी
दाखल करुन घेतल्या जात असल्यामुळे नागरिकांना किमान दिलासा मिळतो.
बँक खात्यांची आणि क्रेडिट कार्डची माहिती चोरुन तसेच ई मेल हॅक करुन , कार्डाचे क्लोनिंग अशा एक ना अनेक प्रकारच्या पद्धती वापरुन चोरटे नागरिकांची खाती रिकामी करीत आहेत. या गोरख धंद्यामध्ये दिल्लीमधील कॉल सेंटर्स मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत. यासोबतच बँकांकडून होणारे केवायसी पॉलिसीबाबतचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करणे जेवढे सोईस्कर होणार आहे, तेवढेच ते धोकादायकही असणार आहे. घरबसल्या नागरिकांच्या खात्यांमधून रातोरात लाखो रुपये लंपास करण्याच्या घटना आगामी काळातही मोठ्या प्रमाणावर वाढण्याचा धोका आहे.
ग्राहकाला मोबाईलवर फोन करुन बँकेचा वरिष्ठ अधिकारी बोलत असल्याची बतावणी केली जाते. त्यांच्याकडून एटीएम अथवा क्रेडीट कार्डची माहिती विचारुन घेतली जाते. त्या माहितीच्या आधारे खात्यामधून लाखो रुपये वर्ग करुन घेतले जातात. यासोबतच ई-मेल आणि फोन कॉल्स अथवा मेसेज पाठवून अशा प्रकारची फसवणूक केली जात आहे. पुण्यामध्ये गेल्या दहा महिन्यांत अशा प्रकारे नागरिकांना तीन कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
तरुण, नोकरदार व गृहिणींचे प्रमाण अधिक
पोलिसांकडील उपलब्ध आकडेवारीनुसार, महाविद्यालयीन तरुण, नोकरदार व गृहिणींचे प्रमाण यात अधिक आहे. विविध विमा कंपन्यांच्या नावे ग्राहकांना फोन करून त्यांच्या चालू अथवा पूर्ण होत आलेल्या पॉलिसींचे पैसे तसेच त्यासोबतच आणखी जास्ती रकमेचे पॅकेज देण्याचे आमिष दाखवले जाते. त्या बदल्यात ग्राहकांना दिलेल्या बँक खात्यावर पैसे भरायला लावले जातात. लाखो रुपये भरल्यानंतरही ग्राहकांना पैसे मिळत नाहीत.
८ नोव्हेंबर ते २८ डिसेंबर (५0 दिवस) दरम्यान दाखल तक्रारी
प्रकार अर्ज
क्रेडीट/डेबीट/एटीएम कार्ड७७
माहिती चोरुन पैसे वर्ग करणे२२६
बनावट क्रेडीट कार्ड२२३
इन्श्युरन्स फ्रॉड0३
ई मेल हॅक करुन पैसे वर्ग करणे0२
आॅनलाईन बिझनेस फ्रॉड २१
सोशल नेटवर्किंग९१
मल्टी लेवल मार्केटींग0१
हॅकिंग२७
मोबाईलसंदर्भात गुन्हे१५
लॉटरी फ्रॉड१८