पुणे लोहगाव येथील नव्या टर्मिनल इमारतीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन
By अजित घस्ते | Published: March 10, 2024 05:27 PM2024-03-10T17:27:06+5:302024-03-10T17:27:14+5:30
नव्या टर्मिनलमुळे देशातील सामान्य माणसासाठी विमान प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होणार
पुणे : लोहगाव येथील नवीन टर्मिनलचे काम पूर्ण होऊन अनेक महिन्यांनंतर ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होते. अखेर रविवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. या नव्या टर्मिनलमुळे देशातील सामान्य माणसासाठी विमान प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होईल, असे प्रतिपादन प्रधानमंत्री मोदी यांनी देशातील विविध विमानतळांचे उद्घाटन प्रसंगी पुणेलोहगाव येथील नव्या टर्मिनल उद्घाटन प्रसंगी केले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार उमा खापरे, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, हवाई वाहतूक मंत्रालयाचे सह सचिव असंगबा चुबा, भारतीय विमान प्राधिकरणाच्या मानव संसाधन विभागाचे सदस्य डॉ. एच श्रीनिवास, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल,मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाचे पुणे विमानतळ व्यवस्थापक संतोष ढोके, माजी महापौर मुरलीधर मोहोळ इ. उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस म्हणाले, पुणे शहराच्या संस्कृतीची अनुभूती करून देणारे टर्मिनल उभा करण्यात आले आहे. पुणे हे एक महत्वाचे शहर आहे. सांस्कृतिक , आयटी हब आहे. देश-विदेशातून अनेक नागरिक पुण्यात येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांना सुविधा देण्यासाठी जुने टर्मिनल अपूरे होते. यामुळे नव्याने भव्य टर्मिनल उभे राहिले आहे.तसेच विमानतळांचे जाळे निर्माण करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. तर पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहे. लवकरच त्यासाठीचे भूसंपादन सुरू करण्यात येणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले ,महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा इमारतीच्या बाहेर उभारण्यात आला आहे. श्री विठ्ठलाचे म्युरल, वारली कला, देशी खेळ मल्लखांब आदींचे दर्शन या इमारतीत घडते. संस्कृतीला साजेसे वातावरण इमारतीत आहे. एप्रिलमध्ये नव्या टर्मिनलच्या सुविधा सुरू करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यात नवे विमानतळ उभारण्यासोबत विद्यमान धावपट्टी वाढविण्याचा विचार करण्यात येत आहे.