ऑनलाईन शिक्षणाने विद्यार्थ्यांची प्रगती खुंटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:08 AM2021-07-09T04:08:17+5:302021-07-09T04:08:17+5:30
एक-एक दिवस असाच चाललेला आहे. त्या चिमुकल्यांसाठी, जी घरात बसून अत्यंत कंटाळली आहेत. सतत ती खेळण्याचा हट्ट करत आहेत. ...
एक-एक दिवस असाच चाललेला आहे. त्या चिमुकल्यांसाठी, जी घरात बसून अत्यंत कंटाळली आहेत. सतत ती खेळण्याचा हट्ट करत आहेत. बाहेर जाण्यासाठी, शाळेत जाण्यासाठी आसुसलेली आहेत. त्यांच्यासाठी तरी किमान आपण काळजी घ्यावी. रोगाला वाढू देऊ नये. एकाचे चुकीचे वागणे हे इतरांना संकटात घेऊन जात आहे. जे शिक्षण शाळेमध्ये मिळते.
आज सारासार विचार करून बारकाईने पाहिले तर वय वर्षे १४ व त्या वयाच्या आतील मुलांची प्रगती खुंटल्यासारखी वाटत आहे. कुठेतरी या मुलांचे नुकसान होत आहे, हे जाणवत आहे. ऑनलाईन हे ऑनलाईनच आहे. गणितासारख्या विषयांना एवढे प्रभावी वाटत नाही. सध्या डोळ्यांचे विकार वाढत आहेत. हे विकार जर कायमस्वरूपी त्यांच्या नशिबी आले तर उद्या त्यांचे भविष्य काय असेल? यामधून कधीकधी असे निदर्शनास येत आहे की, या मुलांना मोबाईलचे वेड लागले आहे. यातून ती वाममार्गाला लागतात की काय, याचीही भीती वाटत आहे. हे लागलेले वेड त्यांचे संस्कार कुठे तरी पुसत आहे. कुठेतरी यांना भविष्याचा धोका दिसत आहे.
आज या रोगामुळे खेड्यातील, गावातील, डोंगर-दऱ्यांतील, आदिवासी भागातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवलेले आहे. कारण, त्यांच्याकडे महागडे सर्व सुविधा युक्त मोबाईल नाहीत. काही ठिकाणी तर मोबाईल आहेत. पण तिथे रेंजच नाही, अशी परिस्थिती सुद्धा खूप ठिकाणी आहे. ही मुले रेंज येण्यासाठी झाडावरती बसून आपला जीव धोक्यात घालून तर काही मुले डोंगरावरती जाऊन शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. कित्येक मुलांनी आपल्याला मोबाईल पालक घेऊन देत नाहीत म्हणून आपला जीव सुद्धा गमावला आहे. एक ना अनेक समस्यांमुळे या मुलांना शिक्षणाचा फार मोठा फटका बसत आहे. आज मुले लिहायचं विसरत आहेत. वाचन विसरत आहेत. बेरीज-गुणाकारसारख्या सोप्या क्रिया विसरू लागली आहेत. परीक्षा नसल्याने ते किती सुधारलेले आहेत. त्यांचे मूल्यमापन काय आहे हे समजत नाही. परीक्षा होत नसल्याने लिहिण्याची गतीसुद्धा कमी होण्याचा धोका वाटत आहे. त्याचप्रमाणे परीक्षा नसल्याने त्यांना कितपत आठवते हेही माहिती होत नाही. त्यांची आठवण क्षमता कमी होण्याचा धोकाही वाढत आहे.
९ वी ते १२ वी या मुलांचे तर अतोनात नुकसान होत आहे. ९ वीकडे १० वीचा पाया, तर ११ वीकडे १२ वीचा पाया म्हणून पाहिले जाते. १० वी व १२ वी वरती मुलांचं पुढील भविष्य अवलंबून राहतं. कित्येक जणांची वेगवेगळी स्वप्नं असतात. ही स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी आपल्या जिवाचे रान करून स्पर्धेत उतरत असतात. ज्या मुलांना ज्या क्षेत्रात जायचे आहे, त्यांची ही स्वप्नं कोलमडून पडतात. यावेळी ही मुलं अत्यंत भावूक होऊन चिंताग्रस्त होतात. कधी कधी ते टोकाचे पाऊल ही उचलताना दिसतात. या महत्त्वाच्या वर्षातील मुलांना शिक्षकही आवर्जून त्याच्या भविष्याची जाणीव करून देताना सांगत असतात. बाळा सहा महिने अभ्यास कर साठ वर्षे सुखाची होतील. कित्येक पालकांचे सुद्धा आपली मुले कुठे तरी आपल्यापेक्षा वेगळी व्हावी, त्यांचे जीवन आपल्यापेक्षा चांगले असावे या हेतूने ती खूप खर्च करायला सुद्धा मागे पुढे पाहात नाहीत. याचीही आपल्याला कित्येक उदाहरणं देता येतील.
मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांचं शैक्षणिक नुकसान इथून पुढं होऊ न देण्यासाठी, ज्यांच्या घरात शिक्षण घेणारे आहेत त्यांनी व ज्यांच्या घरात सध्या शिक्षणात नाही. परंतु भविष्यात शिक्षणासाठी येऊ शकतात त्याचबरोबर तुमचे कोणीतरी नातेवाईक जे सध्या शाळेत इतर कुठेतरी शिकत आहेत त्यांच्यासाठी कृपया मास्क वापरा, अंतर ठेवून संवाद साधा, स्वतःची व इतरांची काळजी घ्या. तरच आपण या संकटातून मुक्त होऊ. या रोगाबरोबरच भविष्यात काही दिवस, आपल्याला कुठेतरी काळजी घेऊन जगावे लागणार आहे. आपल्या बेजबाबदार वागण्यामुळेच आज कित्येक जणांच्या नोकऱ्या व जीव धोक्यात आलेले आहेत व गेलेले आहेत. आपण कुठेतरी चुकतोय किंवा काळजी घेत नाही हे यावरून स्पष्ट दिसते. शासन काळजी घेईलच!! पण आपण एक सुज्ञ नागरिक, जनता म्हणून खरंच नियम पाळू व लवकरच रोगमुक्त होऊन आपल्या चिमुकल्यांचे, मुलांचे शाळेतील व कॉलेजचे जीवन पूर्वीसारखे आनंदीमय चालू होईल यासाठी कटिबद्ध राहून प्रार्थना करूया.
--
शिलरत्न सौदागर बंगाळे
मॉडर्न हायस्कूल,गणेशखिंड, पुणे.