पुणे शहरात 'सेक्स टॉईज' चा ऑनलाईन बाजार ; वर्षाकाठी होतेय कोट्यवधींची उलाढाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 04:28 PM2020-12-03T16:28:01+5:302020-12-03T16:28:45+5:30
एकीकडे केंद्र शासन पॉर्न साईट्सवर बंदी घालत आहे. परंतु, या साईट काही ना काही शक्कल लढवित पाहिल्या जात आहेत.
लक्ष्मण मोरे -
पुणे : शहरात 'सेक्स टॉईज'चा ऑनलाईन बाजार जोमात असून वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. दिल्ली आणि उत्तर भारतातील काही शहरांमधून हा माल पुण्यात पाठविला जात असून कुरिअर कंपन्यांमार्फत या वस्तू ग्राहकांपर्यंत पोचविल्या जात आहेत. खरेदी करणाऱ्यांमध्ये ६५ टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाण पुरुषांचे असून महिलांकडून खरेदीचे प्रमाणही लक्षणीय आहे.
एकीकडे केंद्र शासन पॉर्न साईट्सवर बंदी घालत आहे. परंतु, या साईट काही ना काही शक्कल लढवित पाहिल्या जात आहेत. फेसबुक आणि ट्विटर सारख्या समाज माध्यमांचा वापर करून पॉर्न साहित्य ग्राहकांपर्यंत पोचविले आहे. 'पॉर्न कंटेंट' पाहणाऱ्यांच्या मोबाईलवर 'सेक्स टॉईज' विकणाऱ्यांकडून मेसेज पाठविले जात आहेत. या मेसेजमध्ये हे साहित्य विकणाऱ्या वेबसाईटसह मोबाईल क्रमांकही दिले जातात. वास्तविक भारतामध्ये अशा प्रकारचे लिखित अथवा वास्तुरुप साहित्य विकण्यास बंदी आहे. तसेच त्याचे प्रदर्शन करणे, जाहिरात करणे यालाही बंदी आहे. परंतु, ही बंदी असतानाही या साहित्याची विविध वेबसाईट्सच्या माध्यमातून जाहिरात केली जात आहे. संपर्काची साधने पूर्णपणे वैयक्तिक आल्याने हे साहित्य सहज उपलब्ध होत आहे. यावर सध्यातरी पोलीस आणि शासकीय यंत्रणांचे कोणतेही नियंत्रण नाही. हे साहित्य विकणाऱ्या घटकांवर कोणत्या कायद्याखाली कारवाई करायची याबाबत संदिग्धता आहे. कारण, या वस्तूंच्या वैयक्तिक वापराला बंदी आल्याचे कायद्यात कुठेही नमूद करण्यात आलेले नाही.
---------
१. घरामध्ये सेक्स टॉईज ठेवणे गुन्हा नाही. या वस्तूंचा वापर पूर्णपणे वैयक्तिक असून तो जोपर्यंत खासगी आहे तोपर्यंत गुन्हा ठरत नाही. त्यामुळे वैयक्तिक वापराबाबत अद्याप तरी कायदेशीर मनाई नसल्याचे कायदेतज्ञांचे मत आहे.
२. कोणत्याही लैंगिक भावना उद्देपित करणारे, अश्लीलता प्रदर्शित करणारे साहित्य मागविणे, त्याची विक्री करणे बेकायदा आहे. कलम २९२, २९३ आणि २९४ अन्वये कारवाई केली जाऊ शकते. ३. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ नुसार पाच वर्षांची शिक्षा किंवा एक लाखांचा दंड होऊ शकतो. ही शिक्षा दहा वर्षापर्यंत वाढू शकते आणि दंड देखील दोन लाख रुपयांपर्यंत वाढू शकतो.
------
पुण्यात सेक्स टॉईजचा ऑनलाईन बाजार
स्त्री-पुरुषांच्या लैंगिक अवयवांच्या प्रतिकृतींची विक्री ऑनलाईन केली जात आहे. स्त्री-पुरुषाप्रमाणे तयार केलेल्या नग्न बाहुल्यांनाही (डॉल) मोठी मागणी आहे. यासोबतच उत्तेजना चेतविणारे विविध प्रकारचे जेल, तेल, औषधे याचीही विक्री जोमात आहे.
-------
या साहित्याची आयात मुख्यत्वे चीनमधून मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. दिल्ली, मुंबई, बेंगलोर, पुणे अशा 'कॉस्मोपॉलिटन मेट्रो सिटी'मध्ये या व्यवसायाने जम बसविण्यास सुरुवात केली आहे.
-------
या साहित्याचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेचे सर्वेक्षण केले आहे. लोकांच्या लैंगिक गरजा, आवड यानुसार मार्केटमध्ये विविध सेक्स प्रॉडक्ट्स आणले जात आहेत. भारतातील २०२० मधील सेक्स टॉईजचा व्यवसाय साडेआठशे कोटींच्या पुढे असल्याचे सांगण्यात येते.
-------
'सेक्स टॉईज'च्या ऑनलाईन विक्रीबाबत तक्रार नोंदवायची असल्यास थेट फोन व ईमेलद्वारे माहिती व प्रसारण मंत्रालय, सायबर गुन्हे पोलिसांशी संपर्क साधून तक्रार देता येईल.
------
अश्लीलता प्रदर्शित करणारी पुस्तके, साहित्य, मजकूर, वस्तू, चित्रफिती याची जाहिरात, विक्री करण्यात येत असल्यास त्यावर कलम २९२ नुसार कारवाई केली जाते. याच कलमानुसार 'सेक्स टॉईज'च्या ऑनलाईन विक्रीवर कारवाई करता येते. सेक्स टॉईजबाबत स्पष्ट कायदा किंवा नियम लागू आहे की नाही हे तपासून पहावे लागेल.
- बच्चनसिंह, उपायुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर पोलीस
-------
लॉकडाऊननंतर 'सेक्स टॉईज'च्या मागणीत ६५ टक्के वाढ झाली आहे. जवळपास पाच लाख प्रॉडक्ट्स विकले गेले आहेत. या साहित्याची जाहिरात करणे, प्रदर्शन मांडणे, अश्लीलता पसरविणे यासाठी कलम ९२९२ नुसार कारवाई केली जाऊ शकते. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक प्रकारामध्ये हा प्रकार घडल्यास माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ नुसार कारवाई केली जाऊ शकते.
- रोहन न्यायाधीश,
सायबर सायकॉलॉजिस्ट आणि सायबर गुन्हे तज्ञ