ऑनलाईन 'पिफ'ला चित्रपटप्रेमींचा भरघोस प्रतिसाद; एकापेक्षा एक सरस कलाकृतींची मेजवानी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 04:07 PM2021-03-20T16:07:38+5:302021-03-20T16:08:13+5:30

१९ व्या ऑनलाइन पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला ‘लैला इन हायफा’ या चित्रपटाने १८ मार्च रोजी सुरुवात झाली.

Online 'PIFF' gets huge response from movie lovers | ऑनलाईन 'पिफ'ला चित्रपटप्रेमींचा भरघोस प्रतिसाद; एकापेक्षा एक सरस कलाकृतींची मेजवानी

ऑनलाईन 'पिफ'ला चित्रपटप्रेमींचा भरघोस प्रतिसाद; एकापेक्षा एक सरस कलाकृतींची मेजवानी

Next

पुणे : कोरोनाचे सावट असलेल्या आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीत चित्रपट रसिक मात्र घरबसल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा आस्वाद घेत आहेत. गुरुवार (दि.१८ मार्च )पासून सुरू झालेल्या ऑनलाइन पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ' पिफ 'ला राज्याबरोबरच देशभरातून रसिकांचा उत्स्फूर्त दाद मिळत आहे. 

१९ व्या ऑनलाइन पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला ‘लैला इन हायफा’ या चित्रपटाने १८ मार्च रोजी सुरुवात झाली. याविषयी अधिक माहिती देताना महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल म्हणाले, “कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीचा अंदाज आल्यानंतर चित्रपटगृहात होणारा महोत्सव तात्पुरता स्थगित करत १८ ते २५ मार्च दरम्यान ऑनलाइन महोत्सव करण्याचा आम्ही निर्णय घेतला. अपेक्षेप्रमाणे ऑनलाइन महोत्सवाला चित्रपट रसिकांनी भरघोस प्रतिसाद दिला याचा आम्हाला आनंद आहे. चित्रपटांचे विषय, त्यांची निवड आणि ऑनलाइन व्यासपीठाच्या सुरक्षिततेची खात्री यामुळे चित्रपटप्रेमी सुखावले असून समाज माध्यमांवर देखील ऑनलाइन पिफ हे ट्रेडिंगमध्ये आहे.  

केवळ राज्यामधूनच नव्हे तर देशभरातून रसिकांनी यासाठी नोंदणी केली असून ते त्यांच्या सोयीने सुरक्षितपणे घरामध्ये बसून महोत्सवाचा आस्वाद घेत आहेत. उत्तरप्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, पंजाब, आसाम अशा अनेक राज्यांमधून प्रेक्षक महोत्सवात सहभागी झाले असून जागतिक चित्रपट विभागात निवडलेल्या चित्रपट, माहितीपट यांचे कौतुक देखील करत आहेत असाही आवर्जून उल्लेख पटेल यांनी यावेळी केला.

.......

या वर्षीच्या ऑनलाईन महोत्सवासाठी न्यूझीलंड येथील शिफ्ट ७२ या व्यासपीठाचा वापर करण्यात आला असून यामुळे पायरसी, रेकॉर्डिंग करता येणे शक्य नसल्याने सुरक्षिततेची भावना असल्याचे अनेक प्रेक्षकांनी कळविले आहे. एकीकडे चित्रपटांचा आस्वाद घेत असताना दुसरीकडे प्रेक्षक समाज माध्यमांवर देखील महोत्सवाबद्दल भरभरून बोलत आहेत.

- जब्बार पटेल, संचालक, पिफ 

Web Title: Online 'PIFF' gets huge response from movie lovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.