ऑनलाइन वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, विमाननगर चौकातील हॉटेलवर छापा; दाेन मुलींची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 09:06 AM2023-10-13T09:06:08+5:302023-10-13T09:06:38+5:30
ग्राहकांशी ऑनलाइन संपर्क साधून हॉटेलवर हा वेश्या व्यवसाय सुरू होता....
पुणे : जादा पैशांचे आमिष दाखवून तरुणींकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याचा प्रकार वडगाव शेरी भागात उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करून येथून हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील दोन पीडित तरुणींची सुटका केली. तर, दोन दलालांविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्राहकांशी ऑनलाइन संपर्क साधून हॉटेलवर हा वेश्या व्यवसाय सुरू होता.
दीपक शरयू यादव (२८, रा. चंदननगर, मूळ. रा, झारखंड) व रवी नामक व्यक्ती अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागातील अंमलदार तुषार भिवरकर यांनी फिर्याद दिली आहे. सिलॅन्ट्रो, नानाश्री ग्रँट, विमाननगर चौक, येरवडा या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.
संबंधित एजंट हा पैशाच्या आमिषाने पीडित तरुणींकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागातील अंमलदार तुषार भिवरकर, अमेय रसाळ यांना मिळाली होती. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने संंबंधित ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी येथून उत्तरप्रदेश व हरियाणा राज्यातील दोन तरुणींची सुटका केली. त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. तर, दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे अंमलदार सागर केकाण, संदीप कोळगे, बाबा कर्पे, राजेंद्र कुमावत, रेश्मा कंक यांच्या पथकाने ही कामगिरी केली.