सावधान! OTP शेअर केला नसतानाही पेटीएम पोस्टपेड अकाऊंट झाले खाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 02:30 PM2021-09-25T14:30:59+5:302021-09-25T14:36:07+5:30
पुणे : कोणत्याही प्रकारे ओटीपी शेअर केला नसतानाही तसेच ओटीपी मिळाला नसताना पुण्यातील तरुणाच्या पेटीएम पोस्टपेड अकाऊंटमधून दिल्ली व इतर ...
पुणे : कोणत्याही प्रकारे ओटीपी शेअर केला नसतानाही तसेच ओटीपी मिळाला नसताना पुण्यातील तरुणाच्या पेटीएम पोस्टपेड अकाऊंटमधून दिल्ली व इतर ठिकाणाहून १३ व्यवहाराद्वारे परस्पर रिचार्ज करुन अकाऊंट खाली करण्यात आले. याप्रकरणी अल्केश परदेशी (वय ३३, रा. आनंदनगर, सिंहगड रोड) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
परदेशी यांचा व्यवसाय असून त्यांनी घटनेच्या तीन दिवसापूर्वी एजंटच्या आग्रहामुळे पेटीएम पोस्टपेड या क्रेडिट अकाऊंट सुरु केले होते. १ फेब्रुवारी रोजी रात्री ते इंटरनेट बंद करुन झोपी गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्यांना मेल मिळाले होते. त्यात १३ पेटीएम ट्रान्सेक्शनद्वारे मोबाईल रिचार्ज झालेले दिसले. त्यांचे पेटीएम व्हलेट आणि बँकेतील रक्कम, एफडी सुरक्षित असल्याचे दिसले. त्यांनी ३ दिवसापूर्वी सुरु केलेल्या पेटीएम पोस्टपेडमध्ये त्यांना ९ हजार २५० रुपये क्रेडिट बॅलन्स मिळाला होता. त्याद्वारे परस्पर ८ हजार ९७५ रुपयांचे १३ व्यवहाराद्वारे मोबाईल रिचार्ज करण्यात आले होते. त्यांनी कोणताही ओटीपी शेअर केला नव्हता की त्यांना कोणताही ओटीपी आला नव्हता. तरी त्यांच्या पेटीएम पोस्टपेडमधून व्यवहार झाले.
हे सर्व व्यवहार पहाटे २.२० ते ३.४३ या दरम्यान पैसे काढण्यात आले होते. सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात हे मोबाईल नंबर दिल्ली व उत्तर प्रदेशातील असल्याचे आढळून आले. प्राथमिक तपासाने पुढील तपासासाठी हा गुन्हा सिंहगड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.पेटीएम पोस्ट पेड खाते सुरु केल्यानंतर त्यातून कोणताही व्यवहार केलेला नसताना या तरुणाच्या खात्यातून परस्पर रक्कम काढली गेली आहे. त्याचा रितसर गुन्हा दाखल झाला असताना आता, कंपनीने त्यांना हे पैसे भरा असा तगादा लावला आहे.