आॅनलाइन शॉपिंगच्या कंपनीत पावणेसात लाखांच्या वस्तू चोरीस
By admin | Published: January 5, 2016 10:31 PM2016-01-05T22:31:19+5:302016-01-05T22:31:19+5:30
शहर पोलिसात फिर्याद : सहायक व्यवस्थापकावर संशयाची सुई
सातारा : आॅनलाइन शॉपिंगद्वारे ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तूंच्या पुरवठादार कंपनीच्या येथील कार्यालयातून पावणेसात लाखांहून अधिक रकमेचा ऐवज चोरीला गेल्याने खळबळ उडाली. कंपनीचा सहायक व्यवस्थापक गायब झाल्याने संशयावरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
नितीन रावसाहेब भोसले (वय ३३, रा. पुणे) यांनी यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ‘डिलिव्हरी एसएसएन लॉजिस्टिक्स प्रा. लि.’ या दिल्लीस्थित कंपनीचे ते राज्य सुरक्षाप्रमुख आहेत. या कंपनीद्वारे आॅनलाइन शॉपिंगद्वारे खरेदी केलेल्या वस्तूंची ने-आण आणि वितरण केले जाते.
कंपनीचे सातारा कार्यालय संगमनगर येथे आहे. या कार्यालयातून आॅनलाइन शॉपिंगचा ६ लाख ४४ हजार ७५६ रुपयांचा माल आणि इतर साहित्य अशा एकंदर ६ लाख ८४ हजार ७११ रुपयांच्या वस्तू गायब झाल्याचे रविवारी निदर्शनास
आले.
दरम्यान, कंपनीचा सहायक व्यवस्थापक महेश महादेव स्वामी (रा. शिरोली, जि. कोल्हापूर) हाही गायब झाल्याचे आढळून आले.
त्यामुळे ही चोरी त्यानेच केली असावी, असा कंपनी व्यवस्थापनाला संशय आहे. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)