ऑनलाईन अभ्यासाने विद्यार्थ्यांचा ताण वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:09 AM2021-07-11T04:09:03+5:302021-07-11T04:09:03+5:30
-- खोर : गेल्या दीड वर्षापासून शाळा सुरू झाल्या नसल्याने ऑनलाईन शिक्षण सुरू आहे खरे. मात्र ऑनलाईन संदर्भात विद्यार्थ्यांना ...
--
खोर : गेल्या दीड वर्षापासून शाळा सुरू झाल्या नसल्याने ऑनलाईन शिक्षण सुरू आहे खरे. मात्र ऑनलाईन संदर्भात विद्यार्थ्यांना अध्ययनापासून ते तांत्रिकपर्यंतच्या अनेक गोष्टीत प्रचंड अडचणी येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण प्रचंड वाढत असल्याचे चित्र विशेषत: ग्रामीण भागात दिसत आहे.
खोर (ता.दौंड) येथील श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय यांनी ऑनलाईन शाळा सुरू केली आहे. दररोज सकाळी ८ ते ९ या वेळेत व संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु आहे. मात्र गणित, विज्ञानासारखे विषय प्रत्यक्ष शिक्षक समोर नसल्याने विद्यार्थ्यांना समजण्यास खूप कठीण जात आहेत. ऑनलाईनवर विद्यार्थ्यांकडून नेमके काय अपेक्षित आहे ते सांगणेसुध्दा कठीण जात आहे.
आज ग्रामीण भागातील अनेक घरांमध्ये पालकांसाठी वेगळा व मुलांच्या शिक्षणासाठी वेगळा स्मार्ट फोन घेणे शक्य होत नाही. काही जणांकडे फोन आहेत तर रेंजची उपलब्धता नाही अशा स्थितीत ऑनलाईन शिक्षण प्रणाली अडकून पडली आहे. त्यामुळेच खोरच्या भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा पटसंख्या ५३ आहे. मात्र आज ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी केवळ १५ ते २० मुले हजेरी दर्शवित आहे.
इयत्ता आठवीतील स्वाती ठाकून ही उस्मानाबाद वरून ऑनलाईन शिक्षण घेण्यास हजर राहत आहे ही मोठी कौतुकाची बाब आहे.
आज राहिलेल्या मुलांची शिक्षणाची सोय काय असाच प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. याबाबत श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचे मुख्यध्यापक के. एस. लोणकर म्हणाले की, ऑनलाईन शिकवण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. तालुका पातळीवर व गाव पातळीवर विचार करून ऑनलाईन शिक्षण बंद करून आठवड्यातून किमान दोन वेळा ऑफलाईन शिक्षण सुरू करण्याची परवानगी मिळावी.
--
चौकट :
ऑनलाईन शिकवण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. तालुका पातळीवर व गाव पातळीवर विचार करून ऑनलाईन शिक्षण बंद करून आठवड्यातून किमान दोन वेळा ऑफलाईन शिक्षण सुरू करण्याची परवानगी मिळावी.
- के. एस. लोणकर,
मुख्यध्यापक, श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, खोर
--
तब्बल दीड वर्षापासून मुलांच्या शाळा बंद झाल्या आहेत. मुलांची शिक्षणाच्या बाबतीतील गोडी कमी होत आहे. ऑनलाईन शिक्षण घेण्यास देखील मुले टाळाटाळ करीत आहेत. ग्रामीण भागात कोरोनाच्या सावट कमी आहे. प्रशासनाने ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याची परवानगी द्यावी.
- प्रकाश साळुंके (पालक, खोर)
--
फोटो क्रमांक : १०
फोटोओळ : खोर (ता. दौंड) येथे श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालयातील विध्यार्थी ऑनलाईन अभ्यास करताना. तर काही ठिकाणी मुख्याध्यापक के. एस. लोणकर घरोघरी जाऊन मुलांना शिकवीत आहेत.