शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, ८ नोव्हेंबरपासून भरता येणार ऑनलाईन अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 04:22 PM2017-10-09T16:22:55+5:302017-10-09T16:23:17+5:30
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे (इयत्ता आठवी) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे (इयत्ता आठवी) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षा १८ फेब्रुवारी रोजी होणार असून त्यासाठी ८ नोव्हेंबरपासून आॅनलाईन अर्ज भरता येणार आहेत.
परिषदेच्या संकेतस्थळावर परीक्षेबाबतची सविस्तर माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे. इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेबरोबरच विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षाही याच दिवशी घेतली जाणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते १२.३० यावेळेत प्रथम भाषा व गणित आणि दुपारी १.३० ते ३ या वेळेत तृतीय भाषा व बुध्दिमत्ता चाचणी या विषयांच्या परीक्षा होणार आहेत. या परीक्षेतूनच विद्यानिकेतनमध्ये प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांच्या नावांच्या शिफारशी केल्या जातील.
परीक्षेसाठी ८ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत नियमित शुल्क भरून आॅनलाईन अर्ज करता येईल. तर ८ ते १५ डिसेंबरदरम्यान विलंब शुल्क आणि १६ ते ३१ डिसेंबरदरम्यान अतिविलंब शुल्कासह अर्ज करावा लागेल. ३१ डिसेंबरनंतर आॅनलाईन किंवा आॅफलाईन अर्ज भरता येणार नाही. शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असेल. प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे चार प्रश्नसंच असतील. इयत्ता पाचवीसाठी उत्तरांच्या चार पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल. मात्र आठवीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल २० टक्के प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या चार पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील. ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल.
परीक्षा परिषदेचे संकेतस्थळ -
www.mscepune.in
www.puppss.mscescholarshipexam.in