सॅनिटायझरला केवळ १० टक्केच मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:12 AM2021-03-17T04:12:14+5:302021-03-17T04:12:14+5:30
मार्च-एप्रिल २०२० पासून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. लॉकडाऊन लागू झाल्यावर लोकांना कोरोनाचे गांभीर्य कळू लागले. सी व्हिटॅमिन, ...
मार्च-एप्रिल २०२० पासून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. लॉकडाऊन लागू झाल्यावर लोकांना कोरोनाचे गांभीर्य कळू लागले. सी व्हिटॅमिन, मल्टिव्हिटॅमिनच्या गोळया, सॅनिटायझर यांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली. वैैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी सॅनिटायझरची खरेदी मोठ्या प्रमाणात सर्वत्र सुरु झाली. अनलॉक होऊ लागल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी तसेच कार्यालयांमध्ये सॅनिटायझर, तापमान तपासणी आणि आॅक्सिजन पातळीची मोजणी अनिवार्य करण्यात आल्याने सॅनिटायझरचा वापर वाढला.
नोव्हेंबर ते जानेवारी या काळात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ब-यापैैकी आटोक्यात आली. लोकांना कोरोनासह जगण्याची सवय झाली आणि कोरोनाबद्दलची भीतीही कमी झाली. त्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये शिथिलता येत गेली. फेब्रुवारीपासून कोरोना पुन्हा झपाट्याने वाढत आहे. मात्र, नागरिकांना संकटाचे गांभीर्य राहिलेले नाही. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांचा निष्काळजीपणा वाढला आहे. त्याचीच परिणती सॅनिटायझरच्या वापराचे गांभीर्य कमी होण्यात झाली आहे. मागील वर्षी एका दिवशी ८०-१०० लोक सॅनिटायझरची खरेदी करत होते. ती संख्या १०-२० इतकी कमी झाल्याचे औैषध विक्रेत्यांनी सांगितले.
-------------------
लोकांमधील कोरोनाची भीती निघून गेली आहे, असे वाटते आहे. सॅनिटायझरला मागील वर्षीच्या तुलनेत केवळ १० टक्केच मागणी आहे. सुरुवातीला सॅनिटायझरच्या बाटल्यांचे दर जास्त होते. आता किमतीही कमी झाल्या आहेत. मात्र, नागरिक अपवादानेच सॅनिटायझर खरेदी करत आहेत. लसीकरण सुरु झाल्यानेही लोकांची भीती कमी झाली आहे.
- महेंद्र पितळिया, सचिव, पुणे व्यापारी महासंघ
-----------------------
सध्या सॅनिटायझरला अजिबात मागणी नाही. पूर्वी लोक मोठ्या संख्येने सॅनिटायझरची विचारणा करत होते. आता ती संख्या नगण्य झाली आहे. सॅनिटायझरचा पुरेसा साठाही उपलब्ध आहे.
- अनिल बेलेकर, सचिव, केमिस्ट असोसिएशन
-----------------------
गेल्या वर्षी सॅनिटायझर खूप वेळा खरेदी केले. अगदी फरशी, घरातील वस्तू स्वच्छ करण्यासाठीही सॅनिटायझरचा वापर केला जात होता. आता वापराचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. वर्क फ्रॉम होम सुरु असल्याने दररोज बाहेर पडावे लागत नाही. त्यामुळे घरच्या घरी साबणाने हात धुता येतात. बाहेर जाताना सॅनिटायझची छोटी बाटली सोबत नेता येते.
- श्रुती फडके, तरुणी