Pune: ब्रिटिशकालीन भाटघर धरणात फक्त १० टक्के पाणीसाठा, पाण्याचा विसर्ग बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 01:26 PM2024-04-27T13:26:08+5:302024-04-27T13:29:27+5:30
गतवर्षीच्या तुलनेत धरणात आठ टक्के पाणीसाठा कमी आहे. धरणातील पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे....
भोर (पुणे) : भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरणात सध्या १० टक्के पाणीसाठा शिल्लक असून, मागील वर्षी १८ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत धरणात आठ टक्के पाणीसाठा कमी आहे. धरणातील पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे.
मागील वर्षी नीरा देवघर व भाटघर धरणे १०० टक्के भरली होती. नीरा देवघर धरणात १२ टीएमसी, तर भाटघर धरणात २४ टीएमसी पाणीसाठा होता. सध्या भाटघर धरणात १० टक्के पाणीसाठा राहिल्याने पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आलेला आहे. मागील वर्षी धरणात १८ टक्के पाणीसाठा होता, तर निरादेवघर धरणात १९ टक्के पाणीसाठा असून, धरणातून २३०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मागील वर्षी धरणात ४१ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत २१ टक्के पाणीसाठा कमी आहे. गुंजवणी धरणात २८ टक्के पाणीसाठा असून धरणातून ३०० क्युसेकने पाणी सोडले आहे, तर मागील, वर्षी धरणात ४० टक्के पाणीसाठा होता, म्हणजे धरणात १२ टक्के साठा कमी आहे, तर वीर धरणात सध्या ३८ टक्के साठा असून मागील वर्षी ४७ टक्के पाणीसाठा होता. मागच्या तुलनेत नऊ टक्के साठा कमी आहे. मागील चार महिने तीनही धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे धरणात पाणीसाठा अत्यंत कमी राहिलेला आहे.
दरम्यान, वीर धरणातून निरा डावा कालवा बारामती ८२७ क्युसेकने, तर निरा उजवा कालवा फलटण १५५० क्युसेकने पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी विसर्ग सुरू आहे. दरवर्षी पेक्षा मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या उन्हाळ्यामुळे भोर वेल्हे बरोबरच पूर्व भागातील गावातही मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्यामुळे धरणातून पाणी सोडल्याने पाणीसाठा अत्यंत कमी झाला असून अशीच परिस्थिती राहिल्यास पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. भोर तालुक्यात भाटघर निरादेवघरचे ३६ आणि वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरणाचे ४ असे ४० टीएमसी पाणीसाठा दरवेळी होतो आणि उन्हाळ्यात निरा नदीतून पाणी खाली जाते आणि उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते.