इंदापूरमध्ये रोजगार हमीची केवळ १९ कामे
By Admin | Published: April 24, 2017 04:36 AM2017-04-24T04:36:59+5:302017-04-24T04:36:59+5:30
शासकीय रोजगार हमी योजनेपेक्षा खासगी शेतकऱ्यांच्या रानात मिळणारा रोजगार जादा असल्याने तालुक्यात सहा हजारांहून
इंदापूर : शासकीय रोजगार हमी योजनेपेक्षा खासगी शेतकऱ्यांच्या रानात मिळणारा रोजगार जादा असल्याने तालुक्यात सहा हजारांहून जास्त मजुरांची नोंदणी असताना व रोजगार हमीमधून २ हजार ८१ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. मात्र प्रत्यक्षात १९ कामे सुरू आहेत. त्या कामांवर केवळ १०७ मजूर काम करत असल्याचे चित्र आहे.
शासकीय रोजगार हमीची कामे कमी कालावधीची असतात. शेतकऱ्याकडे मिळणाऱ्या रोजगाराच्या तुलनेत मिळणारा रोजगार हमीची मजुरी कमी आहे. त्यामुळे रोजगार हमीच्या कामांकडे मजुरांचा ओढा नाही. रोजगार हमी योजनेतून कामे व्हावीत. मजुरांना रोजगार मिळण्यासाठी ती नेहेमीपेक्षा जास्त कालावधीची असावीत अशी मजुरांची अपेक्षा आहे. या करिता ग्रामसभांमध्ये या कामांची मागणी व ठराव होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त १ मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेचा यथोचित उपयोग करणे महत्त्वाचे ठरणार आहे.(वार्ताहर)
१ मे रोजी ग्रामपंचायतींनी ठराव घ्यावेत : गटविकास अधिकारी
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेंतर्गत सन २०१७-१८ यावर्षीसाठी इंदापूर तालुक्यात ५ हजार १३२ कामांसाठी अंदाजपत्रकीय १० कोटी ७७ लाख ३० हजार ५३७ रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. अकरा कलमी कार्यक्रमाचे नियोजन असल्याचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, सहायक कार्यक्रम अधिकारी नारायण खाडे यांनी सांगितले.
यामध्ये अहिल्यादेवी सिंचन विहीर, अमृतकुंड शेततळे, अंकुर रोपवाटिका, निर्मल शौचालये, निर्मल शोषखड्डे, कल्पवृक्षफळबाग लागवड, भूसंजीवनी नापेड कंपोस्टिंग, भू-संजीवनी कर्मी कंपोस्टिंग, समृद्ध गाव तलाव योजना व नंदनवन वृक्ष लागवड आदी कामांचा अंतर्भाव आहे. ४ लाख ५३ हजार १६५ मनुष्यदिन रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ४सध्या विहीर, फळबाग लागवड, घरकुल, वृक्षसंवर्धन अशी १९ कामे सुरु आहेत. १०७ मजूर काम करत आहेत.प्रत्येकग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत नावनिहाय, कामनिहाय कामे मंजूर करुन घेतली पाहिजेत. मंजूर काम करणाऱ्या लाभार्थ्यांकडे जॉबकार्ड आवश्यक आहे. ग्रामसभेत निवड केलेल्या कामांचा कृती आराखडा प्रत्येक वर्षी पंचायत समितीकडे पाठविणे गरजेचे आहे.