२० दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा
By admin | Published: May 12, 2017 04:47 AM2017-05-12T04:47:15+5:302017-05-12T04:47:15+5:30
खेड घाटा लगत असलेल्या इंदिरा पाझर तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. तलावातील पाण्याचा प्रंचड उपसा
लोकमत न्यूज नेटवर्क
दावडी : खेड घाटा लगत असलेल्या इंदिरा पाझर तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. तलावातील पाण्याचा प्रंचड उपसा होत असल्याने २0 दिवस टिकेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. उरलेल्या पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करावे; अन्यथा येणाऱ्या काळात पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार आहे.
खेड घाटा लगत इंदिरा पाझर तलाव आहे. पावसाळ्यात हा तलाव तुडुंब भरतो. या तलावाच्या पाण्यावर तिन्हेवाडी, जैदवाडी तसेच आंबेगाव तालुक्यातील पेठ या गावाचा पिण्याचा पाणीपुरवठा या तलावावरुन होतो. तसेच या परिसरातील शेतकरी या तलावातील पाण्यावरती रब्बी हंगामातील व उन्हाळी पिके घेतात. तसेच, या डोंगरात राहणारे राष्ट्रीय पक्षी मोर, तसेच इतर पशुपक्षी या तलावात पाणी पिण्यासाठी येतात. यंदा मात्र या तलावाच्या पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली आहे.
या पाण्याचा शेतीसाठी प्रचंड उपसा, सुयोग्य नियोजनाचा अभाव, जनतेची या बाबत अनास्था, त्यामुळे पाण्याची पातळी खालवत असून २० दिवस टिकेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. राहिलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करून पाणीवाटप करावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.