७० लाखांच्या लोकसंख्येसाठी केवळ २२ आगीचे बंब; पुण्याच्या अग्निशमन दलाची अवस्था
By राजू हिंगे | Updated: January 3, 2025 16:43 IST2025-01-03T16:43:31+5:302025-01-03T16:43:46+5:30
आग विझवण्याव्यतिरिक्त रस्त्यावर सांडलेल्या ऑइलपासून झाडांवर अडकलेले पक्षी, प्राणी वाचविणे, साप पकडणे, आपत्ती व्यवस्थापनात मदत अशी असंख्य कामे दलाकडे असतात

७० लाखांच्या लोकसंख्येसाठी केवळ २२ आगीचे बंब; पुण्याच्या अग्निशमन दलाची अवस्था
पुणे : महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे केवळ २२ आगीचे बंब (फायर इंजिन) असून, मागील दोन वर्षांपासून नवीन बंबाची खरेदीच झालेली नाही. दोन वर्षांपूर्वी या विभागाकडे ४९ बंब होते. मात्र, केंद्र शासनाने १५ वर्षे जुनी झालेली शासकीय वाहने भंगारात काढण्याचे आदेश दिल्याने या विभागाकडील तब्बल २७ बंब आयुर्मान संपल्याने सेवेतून हटविण्यात आले. त्यामुळे केवळ २२ बंबावरच अग्निशमन दलाची भिस्त आहे.
पुणे शहराची लोकसंख्या सुमारे ७० लाखांच्या आसपास गेल्याने शहरासाठी ७० केंद्रांची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात महापालिकेची शहरभर केवळ २० अग्निशमन केंद्रच सुरू आहेत. तर, आणखी पाच केंद्र तयार असून, त्यामध्ये चांदणी चौक, बाणेर (स्मार्ट सिटी), खराडी, महंमदवाडी, धायरी (पारी कंपनीजवळ) या केंद्राचा समावेश आहे. मात्र, ही केंद्र सुरू करायची झाल्यास महापालिकेस आणखी पाच वाहनांची खरेदी करावी लागणार असून, मागील दोन वर्षांपासून ही खरेदी प्रक्रिया सुरू आहे. अग्निशमन विभागाकडे शहरात आपत्तीची स्थिती उद्भवल्यास आग नियंत्रण तसेच इतर तातडीच्या मदतीसाठीची जबाबदारी आहे. मात्र, पुण्यात रस्त्यावर सांडलेल्या ऑइलपासून झाडांवर अडकलेले पक्षी, प्राणी वाचविणे, साप पकडणे, राजकीय कार्यक्रमांसाठी मैदानांवर पाणी मारणे, शहरात कचऱ्याला आग लागणार नाही याची दक्षता घेणे अशीही कामे केली जातात. या विभागास गेली अनेक वर्षे पुरेसे मनुष्यबळही नव्हते. आता, खासगी मनुष्यबळ उपलब्ध झालेले असले तरी वाहनेच नसल्याने हे कर्मचारी काम करणार तरी कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.