संयुक्त पूर्व परीक्षातील केवळ २५८ मुलांना मिळाली संधी; राज्यातील ४ ते ५ हजार विद्यार्थ्यांना फटका बसणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 08:07 PM2022-01-27T20:07:35+5:302022-01-27T20:07:46+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चुकीच्या कारभारामुळे राज्यातील चार ते पाच हजार विद्यार्थ्यांना फटका बसला आहे
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चुकीच्या कारभारामुळे राज्यातील चार ते पाच हजार विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. याविरोधात उच्च न्यायालयात सुरूवातीला ८६ विद्यार्थ्यांना संयुक्त पूर्व परीक्षेतील मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवले हाेते. आता मुंबई उच्च न्यायालय (१६१), औरंगाबाद (८८) आणि नागपूर खंडपीठाने ९ असे २५८ विद्यार्थ्यांना आजच्या सुनावणीत पात्र ठरवले आहे. आता एकूण ३४४ विद्यार्थी मुख्य परीक्षेला पात्र ठरले आहेत. आयोगाच्या अन्यायाविरोधात युवासेना तसेच राज्यातील विविध भागातील विद्यार्थ्यांनी आवाज उठवत न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी घेण्यात आली.
... तर समान न्यायाच्या तत्वाचे उल्लंघन होऊ शकते
केवळ ३४४ मुलांना विशेष न्याय देऊन संविधानातील समान न्यायाच्या तत्वाचे उल्लंघन होऊ शकते याची जाणीव असायला हवीच. त्यामुळे या उमेदवारांच्या याचिकेला प्रातिनिधिक स्वरूपाचे समजून आयोगाने सर्वांना न्याय देऊन संविधानाच्या समान संधी व न्यायाच्या तत्वाचे पालन करून या तरुणांना त्यांचे स्वप्न साकारण्याची संधी द्यावी, अशी मागणी राज्याचे मुख्य सचिव तसेच आयोगाच्या सचिवांकडे युवासेनेचे राज्य सहसचिव कल्पेश यादव यांनी केली आहे.
चौथी उत्तरतालिका जाहीर करा
''विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा असेल तर चौथी उत्तरतालिका जाहीर करावी. कारण आधीच्या तीन उत्तरतालिकेत बरोबर प्रश्नाला चुकीचे आणि चुकीच्या प्रश्नांना बरोबर असा घोळ घातला आहे. त्यामुळे चौथी बरोबर उत्तरतालिका जाहीर करावी. त्यामधूनच पात्र विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे असे पात्र विद्यार्थी सौरभ कोरडे (औरंगाबाद) याने सांगितले.''
... तर पूर्ण निकाल बदलणार
''महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चुकीच्या कामाचा फटका राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना बसला आहे. आयोगाने चौथी उत्तरतालिका जाहीर करावी. त्यामुळे पूर्ण निकाल बदलणार आहे. अन्यथा पात्र असूनही हजारोंना याचा फटका बसणार आहे. याचा आयोगाने विचार करावा असे पात्र विद्यार्थी हनुमंत हिरवे (मुंबई) म्हणाला आहे.''
आयोगाने परीक्षेची तारीख पुढे ढकलावी
''आज २५८ विद्यार्थ्यांना न्यायालयाने पात्र ठरवले आहे. संयुक्त परीक्षेतील या विद्यार्थ्यांची २९ आणि ३० जानेवारी रोजी मुख्य परीक्षा होणार आहे. मात्र, दोन दिवसांत कोणत्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास होणार नाही. त्यामुळे आयोगाने परीक्षेची तारीख पुढे ढकलावी असे तुकाराम हिरवे (पात्र विद्यार्थी) याने सांगितले.''