भामा आसखेड धरणात फक्त २९ टक्केच पाणीसाठा शिल्लक, पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 01:00 PM2024-04-15T13:00:07+5:302024-04-15T13:00:30+5:30
धरणाच्या पश्चिम पट्ट्यात पाण्याची पातळी अतिशय कमी झाल्याने आजच दुष्काळसदृश परिस्थितीस सामोरे जावे लागत आहे....
आसखेड (पुणे) : गेल्या पंचवीस दिवसांपासून भामा आसखेड धरणातून दररोज एक हजार क्युसेकने पाणी सोडत असल्याने धरणातील पाण्याची पातळी अत्यंत कमी झाली असून, भर उन्हाळ्यात तीव्र टंचाईस सामोरे जावे लागेल अशी भीती धरण परिसरातील शेतकरी व नागरिक व्यक्त करत आहेत. तर धरणाच्या पश्चिम पट्ट्यात पाण्याची पातळी अतिशय कमी झाल्याने आजच दुष्काळसदृश परिस्थितीस सामोरे जावे लागत आहे.
साधारणपणे धरणात दरवर्षी एप्रिल महिन्यात सरासरी पन्नास टक्के पाणीसाठा शिल्लक असतो असा अंदाज धरण परिसरातील नागरिकांना असतो. पण यावर्षी धरणाच्या पश्चिम पट्ट्यातील गावांतील नागरिकांचा अंदाज चुकल्याने पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. गतवर्षी सुमारे ५० टक्के पाणीसाठा या दरम्यान भामा आसखेड धरणात होता त्यामुळे सुमारे २५ ते ३० किलोमीटरपर्यंत भागात धरणाच्या पश्चिम पट्ट्यातील नदीपात्रालगतच्या गावातून फुगवाट्याचे पाणी होते. परंतु यंदा पाणी विसर्ग सातत्याने झाल्याने पाण्याची पातळी कमी झाली. बाधित शेतकरीच अडचणीत आले तर काही धरणालगतच्या धरण बाधित गावकऱ्यांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे.
खेड तालुक्यातील भामा आसखेड हे ८.१४ टीएमसीचे मातीचे धरण आहे. परंतु त्याचा फायदा खेडपेक्षा शिरूर आणि दौंड तालुक्यालाच जास्त होतो. धरणग्रस्त, बाधित शेतकरी जमिनी देऊन, बेघर होऊनही पाण्याच्या सुविधांपासून कायम वंचितच राहिले आहेत आणि ‘त्या’ शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे शासन दरबारी अद्यापही प्रलंबित असून या समस्यांवर लवकर तोडगा निघावा असे मत बाधित शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
भामा आसखेड धरण हे चाकण औद्योगिक वसाहत, पुणे, पिंपरी चिंचवड, आळंदी या शहरांसाठी महत्त्वाचे आहे. परंतु खेड तालुक्यातील चाकण शहर आणि औद्योगिक वसाहतीला मे महिन्याच्या अखेरीपर्यंत पाणी पुरेल का ? असे चिंतेचे वातावरण नागरिकांत आहे. कारण सध्या धरणात फक्त २९ टक्के पाणीसाठा आहे.
भामा आसखेड धरणात सध्या एकूण साठा ७६.८६० दलघमी (२.७० टीएमसी), उपयुक्त साठा ६३.३४ दलघमी (२.२३ टीएमसी) इतका साठा आहे. परंतु दि. २१ मार्चपासून आजतागायत (सुमारे २५ दिवस) १००० क्युसेकने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आजअखेर धरणात फक्त २९.१७ टक्के पाणीसाठा आहे.
पाण्याची पातळी खालावल्याने परिसरातील विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे धरणाच्या पश्चिम पट्ट्यातील नागरिकांना मे महिन्याच्या मध्यस्तीस भीषण पाणी टंचाईस सामोरे जावे लागणार आहे. धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने या भागातील कोळीये, गडद, गाबरवाडी, आंभु, वांद्रा, वेल्हावळे आदी गावात नदीपात्र कोरडे पडले आहेत. तसेच काही गावांत पिण्यासाठी अल्पसे पाणी असून वापरासाठी पाणी शिल्लक नसल्याने त्यामुळे जनावरांचे हाल होत आहेत.