Pune Corona: रुग्णालयात ३ ते ४ टक्केच रुग्ण; सध्या केवळ २० - २५ रुग्णांना लागतेय 'Remdesivir'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 10:29 AM2022-01-18T10:29:53+5:302022-01-18T10:30:32+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेमडेसिविर मिळत नसल्याने हाहाकार उडाला उडाल्याने एकेक इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची ससेहोलपट होत होती
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेमडेसिविर मिळत नसल्याने हाहाकार उडाला होता. एकेक इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची ससेहोलपट होत होती. सध्या तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल करावे लागणाऱ्यांचे प्रमाण केवळ ३ ते ४ टक्केच आहे. सध्या शहरात दररोज केवळ २० ते २५ रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन द्यावे लागत आहे. सध्या महापालिकेकडे १००० ते १५०० इंजेक्शनचे डोस उपलब्ध आहेत.
दुसऱ्या लाटेमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाने २४ तास रेमडेसिविर नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला होता. रेमडेसिविरचा काळा बाजार रोखण्याच्या अनुषंगाने शहरी भागात ६ भरारी पथके व ग्रामीण भागात १२ भरारी पथके स्थापन करण्यात आली. रुग्णालये, स्टॉकिस्ट व वितरक यांच्याकडील रेमडेसिविरची उपलब्धता व सुयोग्य वापर यावर नियंत्रण ठेवण्यात आले. रेमडेसिविर इंजेक्शनचे रुग्णालयनिहाय वाटप करण्यात आले. तिसऱ्या लाटेमध्ये मात्र सौम्य किंवा मध्यम स्वरुपाची लक्षणे असलेल्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सध्या तरी रेमडेसिविरची गरज अत्यल्प प्रमाणात भासत आहे.
शहरातील कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण - 35073
रूग्णालयात दाखल - 260
इन्व्हेझिव्ह व्हेंटिलेटरवरील रुग्ण - 26
नॉन इन्व्हेझिव्ह व्हेंटिलेटरवरील रुग्ण - 20
ऑक्सिजनवरील रुग्ण - 214
''मध्यतरीच्या काळात रेमडेसिविरचा वापर पूर्णपणे थांबला होता. आता दिवसभरात २० - २५ रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची गरज भासत आहे. विशेषतः, व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना इंजेक्शन दिले जात आहे. सध्या महापालिकेकडे १००० - १५०० इंजेक्शनचा साठा उपलब्ध आहे असे पुणे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.''