नाझरे जलाशयात केवळ ३ टक्केच उपयुक्त पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:47 AM2018-11-13T00:47:41+5:302018-11-13T00:48:00+5:30

नियोजनाची गरज : उन्हाळयात पाण्यासाठी करावी लागणार पायपीट

Only 3 percent water supply in Nazare reservoir | नाझरे जलाशयात केवळ ३ टक्केच उपयुक्त पाणीसाठा

नाझरे जलाशयात केवळ ३ टक्केच उपयुक्त पाणीसाठा

Next

जेजुरी : पूर्व पुरंदर, जेजुरी आणि पश्चिम बारामती परिसराला शेती व पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या नाझरे जलाशयात अवघा ३ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. मृतसाठ्यातील पाण्याचे नियोजन करून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जेजुरीजवळील नाझरे जलाशयाच्या पाणीसाठ्याची क्षमता ७८८ दशलक्ष घनफूट असून आज या जलाशयात केवळ २१७ दशलक्ष घनफूटएवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. यातील २०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा मृतसाठा असून केवळ उपयुक्त पाणीसाठा १७ दशलक्ष घनफूट शिल्लक आहे. एकूण पाणीसाठ्याच्या ३ टक्केच उपयुक्त पाणीसाठा असल्याची माहिती नाझरे प्रकल्पाधिकाºयांकडून देण्यात आली आहे.

नाझरे जलाशयावरून जेजुरी शहर, जेजुरी औद्योगिक क्षेत्र, आय. एस. एम. टी. कंपनी मोरगाव व १६ गावे, नाझरे व पाच गावे, पारगाव प्रादेशिक योजनेतील कोळविहिरे व मावडी या योजनांना या जलशयावरून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. याशिवाय जलाशयावरून शेती सिंचनासाठी २२८ खातेदारांना शेतीसाठी पाणीपुरवठाहोत असतो. १ नोव्हेंबरपासून शेतीसिंचनाच्या योजना बंद करण्यात आलेल्या आहेत. यावर्षी जलाशयाच्या परिसरात सुमारे ५३३ मिमीएवढे पर्जन्यमान राहिले; मात्र पाणलोटक्षेत्रात ४१० मिमी पर्जन्यमान होते. सुमार पर्जन्यमान राहिल्याने कºहा नदीला यावर्षी मोठा पूर आला नव्हता.

संपूर्ण पावसाळ्यात केवळ ७८ दशलक्ष घनफूटएवढेच पाणी जलाशयात आले होते. पावसाळ्यापूर्वी जलाशयात २०६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. यात ७८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाल्याने केवळ २८४ दशलक्ष घनफूट पाणीसाठाच झाला होता. जलाशयातील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ न झाल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

उन्हाळ्यात याच जलशयावरून सुमारे ५० गावांना पाणीपुरवठा करावा लागणार असल्याने पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. पुढील ८ ते ९ महिने पिण्याचे पाणी पुरवावे लागणार आहे. शेती, कारखानदारी औद्योगिक क्षेत्राचे पाणीही बंद करावे लागणार आहे. बंद पडलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजना सुरू कराव्या लागणार आहेत. भविष्यातील गांभीर्य ओळखून नियोजन करण्यात आल्याचे नाझरे जलाशयाचे शाखा अभियंता शंकर चौलंग यांनी सांगितले.
 

Web Title: Only 3 percent water supply in Nazare reservoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.