जीवावर उदार होऊन मृतदेह हाताळणाऱ्यांना केवळ तीनशे रुपये दाम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:11 AM2021-05-22T04:11:37+5:302021-05-22T04:11:37+5:30

कोरोनायोद्धे तीन महिन्यांच्या कंत्राटावर : ना राहण्याची सोय ना खाण्याची... पुणे : आठ-नऊ तासांची ड्युटी... दिवसाला फक्त ३०० रुपये ...

Only 300 rupees for those who are generous with their lives and handle the dead bodies! | जीवावर उदार होऊन मृतदेह हाताळणाऱ्यांना केवळ तीनशे रुपये दाम !

जीवावर उदार होऊन मृतदेह हाताळणाऱ्यांना केवळ तीनशे रुपये दाम !

Next

कोरोनायोद्धे तीन महिन्यांच्या कंत्राटावर : ना राहण्याची सोय ना खाण्याची...

पुणे : आठ-नऊ तासांची ड्युटी... दिवसाला फक्त ३०० रुपये पगार... नोकरीची शाश्वती केवळ तीन महिन्यांची... दररोज कोरोना रुग्णांशी संपर्क आणि काम करताना सतत स्वतःची आणि कुटुंबाची वाटणारी चिंता अशा परिस्थितीत वॉर्डबॉय कोरोना रुग्णांचे मृतदेह हाताळण्याचे जोखमीचे काम जिवावर उदार होऊन करत आहेत. अनेक जण हे काम करताना आजारीही पडले आहेत. मात्र, तब्येतीची काळजी करत बसण्याची मुभा त्यांना परिस्थितीने दिलेली नाही. त्यांना कोणतेही विमा कवच उपलब्ध नाही.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक रुग्णालयात तीन-तीन महिन्यांच्या करारावर वाॅर्डबॉयची भरती करण्यात आली आहे. वॉर्डबॉयना महिन्याचा पगार केवळ ८००० ते ९००० इतकाच असतो. कोरोनाचे संकट, बंद पडलेले व्यवसाय आणि नोकऱ्या, घरातील बिकट आर्थिक स्थिती, दोन वेळच्या खाण्याची भ्रांत अशा अनेक अडचणींमुळे अनेक तरुण मुलांनी नोकरी पत्करली आहे. मानसिक आणि शारीरिक ताण सहन करतच ते नोकरीचा गाडा हाकण्याचा प्रयत्न करत आहेत. रुग्णालयांनी किमान एक वर्षाच्या कालावधीसाठी नोकरीवर रुजू करून घ्यावे, अशी त्यांची मागणी आहे. एखादा दिवस सुट्टी घेतली तर पगार कापला जाऊ नये, असेही त्यांचे म्हणणे आहे.

------

ससून सर्वोपचार रुग्णालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी पद्धतीने भरलेली पदे - २५०-३००

दिवसाला रोजगार - ३१०-३२० रुपये

कंत्राट - तीन महिन्यांचे

-------

२४ वर्षांचा बबन (नाव बदलले आहे) तळेगावहून ससून सर्वोपचार रुग्णालयात वॉर्डबॉयची नोकरी करण्यासाठी येतो. घरी आई, वडील, आजी, दोन अविवाहित बहिणी, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. तळेगाव स्टेशनजवळील छोट्या वस्तीत कुटुंब राहते. बबन मागच्या वर्षीपर्यंत एका बिल्डरच्या ऑफिसमध्ये ऑफिसबॉयचे काम करत होता. कोरोनामुळे नोकरी गेली, रोजगार गेला. मित्राच्या ओळखीतून तो ससून रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून नोकरीला लागला. कोरोना रुग्णांची स्वच्छता, त्यांचे प्रातर्विधी अशी कामे करायची, रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याचा मृतदेह पॅक करायचा अशी कामे तो करतो. तूटपुंज्या पगारात घरचा खर्च भागत नाही. मात्र, सध्या कोणत्याच प्रकारचे काम मिळत नसल्याचे त्याने सांगितले.

-----

आमची दररोजची ड्युटी आठ तासांची असते. रुजू होताना १२ हजार पगार सांगितला गेला. त्यातले २५०० रुपये पीएफ म्हणून कापले जातात. तीन महिन्यांनी नवीन कंत्राटावर घेतील की नाही, याची कल्पना नाही. तीन महिन्यांचा पीएफ मिळवण्यासाठी चकरा माराव्या लागतील. त्यापेक्षा पूर्ण पगार हातात दिला तर महिन्याचा खर्च भागवणे सोपे होईल. जिल्ह्याच्या विविध भागातून तरुण वॉर्डबॉय म्हणून येतात. बरेचदा जाण्या-येण्याचा, जेवणाचा खर्चही पगारातून भागत नाही.

- विनायक

-----

वॉर्डबॉयच्या मागण्या काय आहेत?

अ. कॉन्ट्रॅक्ट तीन महिन्यांऐवजी एक वर्षाचे करावे

ब. वॉर्डबॉयचा विमा उतरवावा

क. पीएफ कापण्याऐवजी पूर्ण पगार हातात द्यावा

Web Title: Only 300 rupees for those who are generous with their lives and handle the dead bodies!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.