'आयुष्मान भारत' योजनेत पुणे जिल्ह्यात केवळ ४ लाखच कार्ड, अजुनही १२ लाख जणांचा सहभाग नाही

By नितीन चौधरी | Published: October 6, 2023 04:37 PM2023-10-06T16:37:44+5:302023-10-06T16:45:57+5:30

हे उद्दीष्ट डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहे....

Only 4 lakh cards in Pune district, 1.2 lakh people still not participating in 'Ayushman Bharat' scheme | 'आयुष्मान भारत' योजनेत पुणे जिल्ह्यात केवळ ४ लाखच कार्ड, अजुनही १२ लाख जणांचा सहभाग नाही

'आयुष्मान भारत' योजनेत पुणे जिल्ह्यात केवळ ४ लाखच कार्ड, अजुनही १२ लाख जणांचा सहभाग नाही

googlenewsNext

पुणे : आयुष्मान भारत योजनेत जिल्ह्यात एकूण पात्र लाभार्थी १६ लाख ८८ हजार ६८७ असताना आतापर्यंत केवळ ४ लाख २६ हजार ३७३ लाभार्थ्यांनी अर्थात केवळ २५ टक्के लाभार्थ्यांनीच हे कार्ड काढले आहे. त्यामुळे उर्वरित १२ लाख अर्थात ७५ टक्के लाभार्थ्यांचे कार्ड काढण्यासाठी जिल्हा स्तरावर अबियान राबविण्यात येत आहे. त्यात हे उद्दीष्ट डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहे.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र सरकारची आरोग्य विमा योजना असून २३ सप्टेंबर २०१८ पासून राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत एकत्रितरित्या सुरू करण्यात आली आहे. सुधारित एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्यात १ एप्रिल २०२० पासून लागू करण्यात आली आहे. या योजनेत अंगिकृत रुग्णालयात दाखल झालेल्या लाभार्थ्याला प्रति कुटुंब प्रति पॉलिसी वर्ष ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य कवच पुरविण्यात येते. ५ लाखापर्यंतच्या रुग्णालयीन खर्चाचा लाभ पॉलिसी वर्षात कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्य घेऊ शकतात. या योजनेत १ हजार २०९ शस्त्रक्रिया, चिकित्सा, उपचार उपचार समाविष्ट असून पुणे जिल्ह्यात ५७ खासगी व १२ शासकीय अशा एकूण ६९ रुग्णालयांचा समावेश आहे.

२०११ च्या जनगणनेवनुसार यादीतील आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात १ लाख ७९ हजार ३९५ कुटुंबे आणि शहरी भागात २ लाख ७७ हजार ६३३ कुटुंबे अशी ४ लाख ५७ हजार २८ कुटुंबे या योजनेचे पात्र लाभार्थी आहेत. तर एकूण पात्र लाभार्थी १६ लाख ८८ हजार ६८७ असताना आतापर्यंत केवळ ४ लाख २६ हजार ३७३ लाभार्थ्यांनी आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढले आहे. त्यामुळे या योजनेला गती देण्याचे निर्देश सर्व ग्रामपंचायत व नगर परिषदांना दिले आहेत. यासाठी नगर परिषद स्तरावर स्वतंत्र कर्मचारी नेमण्याचे निर्देश देशमुख यांनी संबंधित मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. योजनेत सहभागी होण्यासाठी घरोघरी जाऊन लाभार्थ्यांना कार्ड घेण्यासाठी प्रवृत्त करावे अशा सुचनाही त्यांनी दिल्या आहे. तसेच ग्रामपंचायत स्तरावर सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांनाही त्यांच्या पातळीवर प्रयत्न करण्याचे सांगण्यात आले आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनाही याबाबत सुचना करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गोल्डन कार्ड काढण्यासाठी https://beneficiary.nha.gov.in हे पोर्टल तयार करण्यात आले आहे. यामध्ये लाभार्थी स्वत: कार्ड काढू शकतो. तसेच आशा सेविकांनादेखील हे कार्ड काढण्यासाठी लॉगीन आयडी देण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात १ हजार १९९ आशा सेविकांमार्फत कार्ड काढता येतील.

या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासह आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढून घ्यावीत.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

Web Title: Only 4 lakh cards in Pune district, 1.2 lakh people still not participating in 'Ayushman Bharat' scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.