दुष्काळजन्य परिस्थितीतही रोजगार हमीच्या कामावर राज्यात फक्त ६७ हजार मजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 12:07 PM2019-02-08T12:07:33+5:302019-02-08T12:15:02+5:30
रोजगार हमी अंतर्गत पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील ग्रामपंचायत स्तरावर ५१ हजार ३८२ आणि शासकीय स्तरावर १५ हजार ६२१ कामे अशी ६७ हजार मंजूर आहेत.
पुणे: राज्यात दुष्काळी स्थिती असली तरीही अद्याप रोजगार हमी योजनेच्या कामावर जाणा-या मजूरांच्या संख्येत फारशी वाढ झाल्याचे दिसून येत नाही. पुणे विभागात जानेवारी अखेरपर्यंत ६७ हजार ३६६ मजूर रोजगावर हमीच्या कामावर असून त्यात पुणे जिल्ह्यातील सर्वात कमी ३ हजार २५७ आणि सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक २० हजार ६७५ मजूरांचा समावेश आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पेयजल स्त्रोतांसह भूजल पुनर्भरण करण्याबरोबरच सुक्ष्म व लघु पाटबंधा-याची कामे, सिंचन कालवे,नाली बांधणे, वन जमिनींवर सडक पट्टा, कालवा बांध, तलाव अग्रतट आणि किनारी पट्टे यावर वनरोपण, वृक्षारोपण, वृक्षलागवड आदी कामे केली जातात. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावर केली जाणारी जलसंधारणाची व विविध विकासाची कामे रोजगार हमीच्या माध्यमातून सुरू आहेत.
रोजगार हमी अंतर्गत पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील ग्रामपंचायत स्तरावर ५१ हजार ३८२ आणि शासकीय स्तरावर १५ हजार ६२१ कामे अशी ६७ हजार मंजूर आहेत. पुणे विभागात जानेवारी अखेरपर्यंत २ हजार ६६७ कामे सुरू असून ६७ हजार ३६६ मजूर काम करत आहेत. विभागात सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याने या जिल्ह्यात रोजगार हमीवर जाणा-या मजूरांची संख्या अधिक आहे.
-------------------
पुणे विभागाची रोजगार हमी योजनेच्या कामाची आकडेवारी
जिल्ह्याचे नाव मजूर उपस्थिती
पुणे ३,२५७
सातारा १९,५०६
कोल्हापूर १०,२०७
सांगली २०,६७५
सोलापूर १३,७१२
-----------------------------