पुण्यासाठी शुक्रवारी केवळ ८० रेमडेसिविर इंजेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:12 AM2021-04-24T04:12:16+5:302021-04-24T04:12:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच दररोज रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी देखील वाढत आहे. परंतु, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच दररोज रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी देखील वाढत आहे. परंतु, शुक्रवार (दि.२३) रोजी पुण्यासाठी केवळ ८० इंजेक्शनचा पुरवठा केला. पुण्यात दररोज रेमडेसिविर इंजेक्शन्सची मागणी तब्बल १५ हजारांपेक्षा अधिक आहे, तर ऑक्सिजनची दिवसाला ३२० मे.टनची गरज असताना शुक्रवारी पुण्यासाठी ३०१ मे.टन ऑक्सिजन पुरवठा केला.
पुण्यासोबत संपूर्ण राज्यात कोरोना रुग्ण वाढल्याने रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनच्या मागणीत प्रचंड मोठी वाढ झाली आणि तुटवडा निर्माण झाला. गेल्या काही दिवसांपासून शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा कोटा निश्चित करून त्या प्रमाणात औषध वितरकामार्फत त्या-त्या जिल्ह्यांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिली जातात.
पुणे जिल्ह्यात रुग्णसंख्या लक्षात घेता दिवसाला किमान १५ हजारपेक्षा अधिक रेमडेसिविर इंजेक्शन्सची मागणी आहे. असे असताना शासनाकडून पुण्यासाठी दररोज सरासरी केवळ ३ ते ५ हजार रेमडेसिविर इंजेक्शन्स उपलब्ध करून दिली जातात. परंतु शुक्रवारी केवळ ८० रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिली. तर ऑक्सिजनचा ३०१ मे.टन पुरवठा केला. ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी सांगितले.
-----
शनिवारी चार हजार इंजेक्शन मिळणार
पुण्याला शुक्रवारी केवळ ८० रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध झाल्याने हाॅस्पिटलकडून मागणी असून देखील इंजेक्शन्सचा पुरवठा करता आला नाही. सध्या शहर आणि जिल्ह्यातील तब्बल ५४० हाॅस्पिटलने अधिकृत नोंद करून कोविड रुग्णांवर उपचार सुरू केले आहेत. या सर्व हाॅस्पिटलकडून दररोज रेमडेसिविर इंजेक्शन्सची मागणी केली जाते. आता शनिवारी (दि.२४) रोजी पुण्यासाठी किमान ४ हजार रेमडेसिविर इंजेक्शन्स उपलब्ध होणार आहेत. यामुळे शनिवारी संध्याकाळपर्यंत सर्व हाॅस्पिटला ३७ टक्के प्रमाणात इंजेक्शन वाटप करण्यात येणार आहे.
- विजयसिंह देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी