एकच नशा आता फक्त ढोल ताशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:11 AM2021-07-28T04:11:25+5:302021-07-28T04:11:25+5:30

अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवसापासून ढोल पथकातील युवकांना पुढच्या वर्षीच्या वादनाची आतुरता असते. गणरायाच्या आगमनाने ताशाची पहिली तर्री आणि ढोलाच्या ...

The only addiction now is just the drum tasha | एकच नशा आता फक्त ढोल ताशा

एकच नशा आता फक्त ढोल ताशा

Next

अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवसापासून ढोल पथकातील युवकांना पुढच्या वर्षीच्या वादनाची आतुरता असते. गणरायाच्या आगमनाने ताशाची पहिली तर्री आणि ढोलाच्या ठेक्याला सुरुवात होते. ढोल - ताशाकडे छंद, आवड म्हणून बघणारे तरुण - तरुणी वादनासाठी गणारायाच्या आगमनाची वाट पाहत असतात. तोच गणेश चतुर्थीचा पाहिला दिवस उगवल्यावर एकच नशा आता फक्त ढोल ताशा याच अविर्भावात दहा दिवस वादन करण्यात गुंतून जातात.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. त्यानंतर बदलत्या पिढीनुसार गणेशोत्सवाचे स्वरूपही बदलत गेले. पूर्वी ढोलकी, संभळ, हलगी, बेंजो वाजवत गणरायाची मिरवणूक काढली जात होती. बदलत्या काळानुसार त्यामध्ये बँड, ढोल - ताशा, लेझीम, टिपरी पथके, यांचा समावेश होत गेला. तर आधुनिक युगात ढोल - ताशा हे वाद्य मोठया प्रमाणावर प्रसिद्ध झाले.

संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो. पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाचे तर जगभरात कौतुक होत असते. पण या उत्सवात वाजवणाऱ्या बँड पथक, ढोल ताशा, डॉल्बी, अशा गोष्टींमुळे नाविण्यता दिसून येते.

पुणे शहरात जवळपास १७० नोंदणीकृत ढोल पथके आहेत. प्रत्येक पथकात ४०० ते ५०० याप्रमाणे २५ ते ३० हजार युवक - युवती वाजवण्यास उत्सुक असतात. महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच, नोकरदार वर्ग, ज्येष्ठ व्यक्ती अतिशय उत्साहाने या पथकात सहभागी होतात.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला शालेय गणपतीच्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने ढोल - ताशा वाजवण्यास सुरुवात झाली. पुण्यातील गरवारे, ज्ञानप्रबोधिनी, नूतन मराठी विद्यालय या शाळेत विद्यार्थ्यांकडून ढोल ताशाची तयारी करून घेतली जात असे. सध्याच्या पथकात शिस्त, नियम पाळले जातात. विद्यार्थ्यांना शिस्त, नियम आणि अटी घालून देण्याचे काम शालेय स्तरावरच सुरू झाले होते. तीच शिस्तीची परंपरा पुण्यातील सर्व पथकांमध्ये अजूनही टिकून असल्याचे सकारात्मक चित्र आहे.

गणेशोत्सवाची वाट बघणारे पथकातील युवक - युवती सामाजिक उपक्रमातही सक्रिय सहभाग दाखवत आहेत. वर्षभर रक्तदान शिबिरे, अनाथ संस्थांना मदत, गरीब - गरजून धान्य वाटप, विद्यार्थ्यांसाठी शालेय उपक्रम राबवणे, यांनाही प्राधान्य दिले जाते. पथकातील सर्वांना एकत्र ठेवण्याबरोबरच, समाजासाठी आपले काहीतरी देणे आहे. याची जाणीव होण्यासाठी पथकांमार्फत अन्य गोष्टीही केल्या जातात. गणेशोत्सवात दरवर्षी या पथकांवर आर्थिक उलाढालीबाबत टीका होत असते. मात्र या सामाजिक उपक्रमातून या युवक आणि युवतींनी खोडून काढली आहे.

मागील दोन वर्षांपासून जगावरच कोरोना महामारीचे संकट आले आहे. सण, उत्सवावरही त्यामुळे बंधने आली आहेत. त्यामुळे ढोल पथकांना वादनापासून मुकावे लागले आहे. तरीही सर्वकाही पूर्वपदावर आल्यावर त्याच जल्लोषात वादन करणार असल्याचे पथक प्रमुखांनी सांगितले आहे. शालेय जीवनात टिपरी, लेझीम, समूहनृत्य, टाळ - मृदंग वाद्यची परंपरा ढोल ताशात आणली. त्याचबरोबर ध्वज पथकही यामध्ये उतरवले. वादनबरोबरच आता पथकातून कलाकृतीचेही सादरीकरण होत असते. त्यामुळे गणरायाच्या मिरवणुकीतले वेगळेपण हे पथकातून नेहमीच दिसून येत असते. आता कोरोनाची महामारी असली तरी पथके समाज कार्यात अग्रेसर आहेत. सर्वच पथकांकडून या कोरोना काळात सर्वतोपरी मदत करण्यात आली आहे. रक्तदान शिबिरे, रुग्णांना बेड मिळवून देणे, संचारबंदीत धान्य वाटप, रस्त्यावरील लोकांसाठी फूड पॅकेट, आरोग्य विषयक मदत, तसेच शासनाला सहकार्य करण्याचेही काम पथके करत असल्याचे प्रमुखांनी सांगितले आहे.

गणेशोत्सवात नदीचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने पथकांकडून मूर्ती संकलन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. तसेच पूरपरिस्थितीजन्य भागात किट वाटपाचे नियोजन करण्यात येणार आहे. एकंदरीतच सामाजिक कार्यात पथकांचा सक्रिय सहभाग दिसून येत आहे.

महाराष्ट्रात वादन संस्कृती टिकवून ठेवण्याची जुनी परंपरा आहे. संत, व्याख्याते, कीर्तनकार, भजनी मंडळे, संगीतकार, अशा अनेकांचा वादन संस्कृती टिकवून ठेवण्यात मोलाचा वाटा आहे. आधुनिक काळात तंत्रज्ञानावर चालणारी वाद्य उदयास आली. तरी ढोल - ताशा सारख्या वाद्य अजरामर राहतील.

भविष्यातही सर्व ढोल - पथके पूर्वीपेक्षा अधिक उत्साह दाखवून ढोल वादनात सहभागी होतील. पथकात दिवसेंदिवस युवक - युवतींची संख्या वाढत आहे. तसेच पथकांच्या वतीने येणाऱ्यांचे स्वागतच असणार आहे. ढोल पथकातील युवक, युवती, नोकरदार वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक या सर्वांचा वाढता सहभाग हीच ढोल पथकांची नवी सुरुवात आहे.

Web Title: The only addiction now is just the drum tasha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.