एका शाळेवर कमीत कमी तीन वर्षांच्या सेवेनंतरच बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 02:03 AM2019-03-14T02:03:02+5:302019-03-14T02:03:11+5:30
हजारो प्राथमिक शिक्षकांना दिलासा; जिल्ह्यांतर्गत बदल्यांसाठी ग्रामविकास विभागाचे शुद्धिपत्रक
नीरा : जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या प्रगतीपथावर असून शासनाने लगेचच जिल्ह्यांतर्गत बदल्यांच्या कार्यवाहीला सुरुवात केली आहे. मात्र आता एकदा बदली झाल्यानंतर एका शाळेवर तीन वर्षे सेवा केल्याशिवाय संबंधित शिक्षकाची लगेच बदली करता येणार नाही, असे फर्मान शासनाने काढले असून त्यामुळे दर वर्षाच्या बदल्यांच्या खो-खोपासून हजारो शिक्षकांचा जीव भांड्यात पडला आहे.
आगामी मे महिन्यापूर्वी बदली प्रक्रिया पार पाडण्याचा शासनाचा मानस आहे. त्यादृष्टीने प्रथम आंतरजिल्हा बदल्यांच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. रिक्त जागांची बदली यादी त्या त्या जिल्हा परिषद पोर्टलवर उपलब्ध करून देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. बदल्या जरी मार्च-एप्रिलमध्ये होणार असल्या तरी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक कर्तव्य पार पाडल्यावर मे महिन्यात शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येणार आहे.
२७ फेब्रुवारी २०१७ च्या धोरणाप्रमाणे शिक्षकांच्या बदल्यांची संगणकीय पद्धत वापरण्यात येत आहे. हा आंतरजिल्हा बदल्यांच्या तिसरा तर जिल्ह्यांतर्गत बदल्यांचा दुसरा टप्पा आहे. जिल्हांतर्गत बदल्यांच्याबाबतीत अवघड क्षेत्रात तीन वर्षे तर सोप्या क्षेत्रात सलग दहा
वर्षे जिल्ह्यातील सेवा झालेले शिक्षक बदलीप्राप्त ठरले आहेत. नेहमीच्या पद्धतीने एकाच जिल्ह्यात बदली होत असल्याने जिल्ह्यातील सेवेचा विचार करता पुन्हा असे शिक्षक बदलीप्राप्त ठरणार होते. त्यामुळे दरवर्षी बदल्यांची टांगती तलवार शिक्षकांच्या मानगुटीवर होती.
राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी याबाबत उच्च न्यायालयात दाद मागितली होती. दरम्यान, न्यायालयाने याबाबत प्रशासनाला एकदा शिक्षकाची बदली झाल्यानंतर पुन्हा बदलीसाठी काही कालावधी निश्चित केला आहे का? याबाबत विचारणा केली होती. त्याप्रमाणे शासनाने सुधारणा केली असून आता बदली झाल्यानंतर त्या शिक्षकाची एका शाळेवर तीन वर्षे सेवा झाल्यानंतरच संबंधित शिक्षक पुन्हा बदली अधिकारप्राप्त ठरणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
खुल्या जागांच्या आकडेवारीत संभ्रम
सध्या पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, अनेक जिल्ह्यांत एसइबीसी, तसेच खुल्या जागांची संख्या शून्य दाखविली आहे. वास्तविक याबाबत माहिती घेतली असता जिल्ह्यात अनेक जागा रिक्त आहेत; मात्र प्रशासने जाणीवपूर्वक खुल्या जागा दाखवल्या नसल्याची चर्चा आहे.
आंतरजिल्हा बदल्यांपासून अनेक शिक्षक वंचित राहणार
जिल्हा प्रशासनाने रिक्त जागांची वस्तुस्थितीदर्शक माहिती बदली पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. सध्या गेल्या अनेक वर्षांपासून पुणे जिल्ह्यात खुल्या जागा रिक्त नसल्याचे सांगितले जात आहे.
मात्र अनेक तालुक्यांत अनेक शाळांत शिक्षकांची पदे रिक्त आहेत. असे असताना सर्वच संवर्गाच्या जागांची माहिती भरणे आवश्यक आहे. अन्यथा बदल्यांची अपेक्षित साखळी फिरणार नसल्याने हजारो शिक्षकांना स्वगृही परतता येणार नाही.
शासनाच्या निर्णयामुळे बदल्यांच्या दरवर्षीच्या खो-खोपासून किमान एकदा बदली झाल्यानंतर तीन वर्षे तरी संबंधित शिक्षकाची सुटका होणार आहे. मोठ्या प्रमाणावर शिक्षक बदलीपासून वंचित राहू नयेत, यासाठी जिल्हा परिषदांनी बदली पोर्टलमध्ये रिक्त जागांची वस्तुनिष्ठ आकडेवारी भरणे गरजेचे आहे. खुल्या जागा रिक्त असल्याचे दिसत आहे, मात्र त्या दाखवल्या जात नसल्याने अनेक वर्षांपासून असलेला संभ्रम आजही कायम आहे. - राहुल शिंदे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य दुर्गम क्रांती शिक्षक संघटना