मोदींच्या सभेसाठी झाडं नव्हे, फक्त फांद्या तोडल्या; पुण्याच्या महापौरांचा अजब दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 04:50 PM2019-10-15T16:50:22+5:302019-10-15T16:56:59+5:30
मोदींच्या सभेसाठी जवळपास 20 झाडांवर कुऱ्हाड
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी महाविद्यालय परिसरातील झाडं तोडल्यामुळे एका बाजूला संताप व्यक्त होत असताना पुण्याच्या महापौरांनी अजब दावा केला आहे. मोदींच्या सभेसाठी झाडं नव्हे, तर फक्त फांद्या तोडल्या, असं पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी म्हटलं आहे. टिळक रस्त्यावरील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर 17 ऑक्टोबरला मोदींची सभा होणार आहे.
पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी व्यासपीठाच्या जवळ असणारी आणि सुरक्षेला अडथळा आणणारी जवळपास 20 झाडं तोडण्यात आली. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता झाडं नव्हे, फांद्या तोडण्यात आल्याचा अजब दावा महापौर मुक्ता टिळक यांनी केला. 'फांद्या तोडण्यासाठी पालिकेची परवानगी घेण्यात आली होती. तशी रितसर परवानगी मिळाल्यानंतरच फांद्या तोडण्यात आल्या,' असं महापौर म्हणाल्या.
पंतप्रधानांची सभा असल्यानं त्यावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी फांद्या कापण्यात आल्याचं टिळक यांनी सांगितलं. 'परवा पुण्यात वादळी पाऊस झाला होता. त्यामुळे झाडपडीच्या घटना घडल्या. आता 17 तारखेला पंतप्रधानांची सभा आहे. त्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून फांद्या तोडण्यात आल्या. याबद्दलची परवानगी देण्याचा अधिकार आयुक्तांना असतो. कारण ते वृक्ष प्राधिकरण समितीचे चेअरमन असतात,' असं टिळक म्हणाल्या. 'ज्या ठिकाणच्या फांद्या कापण्यात आल्या, ती जागा खासगी आहे. त्यामुळे त्यासाठीची परवानगी लोकप्रतिनिधी मागत नसतात. तिथल्या संस्थेनं तशा प्रकारची परवानगी मागितली असेल आणि पालिकेनं परवानगी देण्याची शक्यता आहे,' असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं.
याआधी 14 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने सिंहगड रस्त्यावरील झाडे कापण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी त्याची गंभीर दखल घेऊन कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले होते. पण ते आश्वासन हवेतच विरले. दुसरीकडे या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली असून खासदार वंदना चव्हाण यांनी आयुक्त सौरभ राव यांना पत्र देऊन दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.