कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कागदावरच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:13 AM2021-02-25T04:13:23+5:302021-02-25T04:13:23+5:30
एखादा रुग्णामध्ये कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्याच्या संपर्कातील हाय रिस्क आणि लो रिस्क अशा २० जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जावे, ...
एखादा रुग्णामध्ये कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्याच्या संपर्कातील हाय रिस्क आणि लो रिस्क अशा २० जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जावे, असा नियम आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून एका रुग्णामागे १२ ते १७ जणांचे ट्रेसिंग केल्याचा दावा केला जात आहे. रुग्णाचा अहवाल आल्यानंतर २४ तासांच्या आत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जाते. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना दिल्या जातात, असेही आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात ट्रेसिंग होत नसल्याने समन्वयाचा अभाव आहे की प्रक्रिया शिथिल झाली आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
---
पॉईंटर्स :
कोरोनाचे एकूण रूग्ण - १,९९,६९६
बरे झालेले रूग्ण - १,९१,३००
उपचार सुरू असलेले रूग्ण - ३५५९
कोरोनाबळी - ४८३७
---
केस १ : वास आणि चव गेल्याने कर्वेनगर येथील व्यक्तीने महापालिकेच्या रुग्णालयात चाचणी करण्यात आली. चाचणी पॉझिटिव्ह आल्याने घरातील सर्व व्यक्तींनी चाचणी करुन घेतली. पती-पत्नीची चाचणी १६ फेब्रुवारी रोजी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर पुढील दोन दिवस महापालिकेकडून तब्येतीची चौकशी करण्यासाठी फोन आला. मात्र, रुग्ण कोणाकोणाच्या संपर्कात आले, हाय रिस्क किंवा लो रिस्कमधील कोण असू शकतात, याबाबत कोणतीही चौकशी झाली नाही.
केस २ : डीएसके विश्व येथील रहिवासी असलेले पती, पत्नी आणि मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात झाले. पत्नी आणि मुलीला होम आयसोलेशन ठेवण्यात आले, तर पतीला सलग चार-पाच दिवस ताप असल्याने हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले. महापालिकेकडून दररोज तब्येतीची चौकशी करण्यासाठी फोन येत होता. मात्र, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगबाबत कोणतीही विचारणा झाली नाही.
केस ३ : भावाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने धायरी येथील व्यक्तीने पत्नी आणि वहिनीसह चाचणी करुन घेतली. वहिनीची आणि त्या व्यक्तीची टेस्ट सोमवारी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर बुधवारी संध्याकाळपर्यंत कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी महापालिकेच्या कर्मचा-यांकडून कोणतीही माहिती विचारण्यात आली नव्हती.
--------------------
दैनंदिन अहवाल दुपारी ४-५ वाजण्याच्या दरम्यान सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडे पाठवला जातो. त्यानंतर पुढील २४ तासांमध्ये त्यांनी आपल्या हद्दीतील रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी करणे आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे बंधनकारक आहे. प्रत्येक रुग्णाच्या मागे सध्या १२ ते १७ जणांचे ट्रेसिंग केले जात आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नसल्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधता येईल.
- डॉ. आशिष भारती, आरोग्यप्रमुख, पुणे महानगरपालिका