Aditya Thackeray: महाराष्ट्र सरकारकडं एप्रिल 2022 पासून फक्त इलेक्ट्रिक गाड्या असणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 08:31 PM2021-09-29T20:31:37+5:302021-09-29T20:32:15+5:30
विभागीय आयुक्त कार्यालयात कार्बन न्यूट्रल आणि माझी वसुंधरा अभियानाबाबत आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील आढावा घेण्यात आला
पुणे : राज्यात सध्या पर्यावरण बदल हा विषय गांभीर्याने घेतला असून, वातावरणातील बदल आणि विविध उपाययोजनांवर काम सुरू आहे. याचच एक भाग म्हणून राज्यात एप्रिल 2022 पासून प्रशासनामध्ये फक्त इलेक्ट्रिक गाड्याच वापरण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुण्यात दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयात कार्बन न्यूट्रल आणि माझी वसुंधरा अभियानाबाबत आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील आढावा घेण्यात आला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली.
''राज्यात प्लॅस्टिक बंदी झाल्यानंतर पुण्याने राज्यात सर्वाधिक चांगले काम केले. आता कार्बन न्यूट्रल शहरासाठी देखील पुण्याने पुढाकार घेतला पाहिजे. जिल्ह्यात व पुणे विभागात माझी वसुंधरा अभियानात चांगले काम झाले असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. पुणे शहर आणि जिल्ह्यात विविध प्रकल्प हाती घेण्यात आले असून, पुढील दोन-तीन महिन्यांत हे प्रकल्प राबविताना पर्यावरणाचा विचार होण्यासाठी वेगळे पाऊल उचलले जाणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान ठाकरे यांनी आपल्या एक दिवसाच्या पुणे दौऱ्यात पिंपरी येथील टाटा मोटर्स कंपनीला भेट देऊन इलेक्ट्रिक वाहन प्रक्रियेची माहिती घेतली.''
राजकीय प्रश्नांना उत्तर देणे टाळले
आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख नेत्याची, पुणे शहरांतील शिवसेना नगरसेवक यांची भेट घेऊन आढावा घेतला. या बैठकीत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात वातावरण बदल होणार का, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत तीन प्रभाग पध्दतीमध्ये महाआघाडीत वाद निर्माण झालेत का अशा सर्वच राजकीय प्रश्नांची उत्तरे देणे ठाकरे यांनी जाणीवपूर्वक टाळले.