अवघ्या काही रुपयांत ५ लाखांचे विमा कवच, स्थायी समितीची योजना, करदात्या कुटुंबांना होणार फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 03:26 AM2017-10-20T03:26:17+5:302017-10-20T03:26:38+5:30
महापालिकेच्या स्थायी समितीने शहरातील करदात्या कुटुंबप्रमुखांचा अवघ्या ७० रुपयांमध्ये ५ लाख रुपयांचा विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘श्यामाप्रसाद मुखर्जी विमा योजना’ असे या योजनेचे नामकरण करण्यात आले आहे.
पुणे : महापालिकेच्या स्थायी समितीने शहरातील करदात्या कुटुंबप्रमुखांचा अवघ्या ७० रुपयांमध्ये ५ लाख रुपयांचा विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘श्यामाप्रसाद मुखर्जी विमा योजना’ असे या योजनेचे नामकरण करण्यात आले आहे. करदाता कुटुंबप्रमुख दुर्दैैवाने एखाद्या अपघातात सापडला तर त्याच्या कुटुंबाला या विमा योजनेचा फायदा होणार आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी अंदाजपत्रक सादर करतानाच या योजनेची कल्पना मांडली होती. त्या वेळी त्यावर अनेकांनी टीका केली, मात्र आता ही योजना आणखी महिनाभरात प्रत्यक्षात येत असून, त्याची सर्व प्राथमिक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. अंदाजपत्रकात या योजनेसाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मोहोळ यांनी सांगितले, की टीका करणाºयांना योजनेचे मर्मच समजले नाही. महापालिकेचे एकूण ८ लाख २५ हजार करदाते आहेत. त्याशिवाय झोपडपट्टीतील रहिवाशांकडून महापालिका सेवाशुल्क घेत असते. त्यांची संख्या साधारण २ लाखांच्या आसपास आहे. यातील कर जमा करणाºयांच्या कुटुंबप्रमुखाला एखादा अपघात झाला व त्यात दुर्र्दैैवाने त्याचे काही बरेवाईट झाले तर त्या कुटुंबाला उदरनिर्वाहाचा काही मार्ग शोधावाच लागतो. त्यात बराच वेळ जातो. त्यादरम्यानच्या काळात जगण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे काहीच राहात नाही. अशा वेळी ही योजना उपयोगी पडेल.
महापालिका : अपघाती विम्याचे पैसे तत्काळ
महापालिका यात प्रत्येक करदात्या कुटुंबाचा ७० रुपयांचा विमा उतरवणार आहे. त्याचे प्रमाणपत्र त्याला दिले जाईल. कराप्रमाणेच हा विमाही वार्षिक असेल. त्या वर्षात त्याला दुर्दैैवाने अपघात वगैरे झाला तर त्याला विम्याचे पैसे तत्काळ मिळतील. याचीही रचना करण्यात आली आहे. थोडा जखमी असेल तर २५ हजार, जास्त जखमी असेल तर ५० हजार, एखादा अवयव निकामी झाला असेल तर १ लाख, त्यापेक्षा जास्त काही झाले असेल तर २ ते ४ लाख व दुर्दैैवाने मुत्युमुखी पडल्यास ५ लाख रुपये दिले जातील.
यात फक्त संबंधित करदात्याने पूर्ण कर जमा केलेला असावा, त्याच्या नावे थकबाकी नको इतकीच अट ठेवण्यात आली आहे. दरवर्षी त्याने कर जमा केला की लगेचच त्याच्या नावाचा विमा उतरवला जाईल. यासाठीचा सर्व खर्च महापालिका करणार आहे व महापालिकेच्या एकूण अंदाजपत्रकाच्या तुलनेत तो अत्यंत कमी असाच आहे असे मोहोळ म्हणाले. या योजनेमुळे महापालिकेच्या मिळकर कर भरण्यात चांगली वाढ होईल, असा विश्वासही मोहोळ यांनी व्यक्त केला.