फक्त पाचशे मीटरसाठी उड्डाणपूल रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 03:27 AM2018-10-31T03:27:23+5:302018-10-31T03:27:44+5:30

ताडीगुत्ता पुलाची प्रतीक्षा संपेना अन् पूल काही सुरू होईना

Only five hundred meters flyover stops | फक्त पाचशे मीटरसाठी उड्डाणपूल रखडला

फक्त पाचशे मीटरसाठी उड्डाणपूल रखडला

Next

- मनोज गायकवाड 

मुंढवा : मुंढवा येथील भारत फोर्ज कंपनीच्या मागील बाजूला पुणे-सोलापूर रेल्वेलाईनवरील मुंढवा आणि मगरपट्टा यांना जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित रेल्वे उड्डाणपुलाचे काम अनेक महिन्यांपासून सुरू होते. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे; परंतु उड्डाणपुलाच्या पुढील ५०० मीटरच्या खासगी जागेचे जमीन अधिग्रहण पूर्ण न झाल्यामुळे व जागामालकाने महापालिकेविरुद्ध पोलिसांत तक्रार केल्यामुळे संपूर्ण प्रकल्पाचे भवितव्यच टांगणीला लागले आहे.

या मे २०१८ पर्यंत उर्वरित काम मार्गी लागणे अपेक्षित होते. मुंढवा (ताडीगुत्ता) - मगरपट्टा या नव्याने होणाºया रेल्वे उड्डाणपुलाचे काम जुलै २०१६मध्ये सुरू झाले. या रेल्वे उड्डाणपुलाची लांबी ६४० मीटर असून रुंदी सर्व्हिस रोडसह २४ मीटर आहे. मगरपट्टा-मुंढवा-खराडी हा बायपास रस्ता सोलापूर महामार्ग व नगररस्ता यांना जोडणारा प्रमुख रस्ता आहे. या रस्त्यावर कायमच वाहतुकीची प्रचंड कोंडी पाहायला मिळते. तासन् तास ही वाहतूककोंडी फुटत नाही. या रेल्वे उड्डाणपुलाचे काम त्वरित पूर्ण झाल्यास वाहनचालकांची मोठी सोय होणार आहे व या परिसरातली वाहतूकव्यवस्था सुरळीत होण्यास मदत होईल.

उशिरा का होईना या पूलाचे काम आता पूर्ण झाले आहे; परंतु पुलापुढील रस्त्याचे काम रेंगाळल्याने पूल होऊनही तो वापरता येत नसल्याने वाहनचालकांची निराशा होत आहे. आता अजून किती महिन्यांनी या पुलावरून मार्गस्थ होता येईल, याची प्रतीक्षा वाहनचालक मोठ्या आशेने करीत आहेत. हा रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाला, तर भविष्यात मुंढवा-मगरपट्टा परिसरातील वाहतूक सुरळीत होईल. या मार्गावरील सर्व वाहने या नवीन उड्डाणपुलावरून मार्गस्थ होऊन मुंढवा परिसरातील रस्ते मोकळा श्वास घेतील. त्यासाठी येथील उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर करणे आता गरजेचे आहे.

प्रकल्पाचा फायदा होणारी उपनगरे
या नवीन उड्डाणपुलामुळे कोरेगाव पार्क, विमाननगर, लोहगाव विमानतळ, पुणे रेल्वे स्टेशन येथील वाहनचालकांना मगरपट्टा, वानवडी, कोंढवा, स्वारगेट, कात्रज या मार्गांकडे सहज मार्गस्थ होता येईल. तरी, या पुलाचे काम कधी संपणार व हा पूल वाहतुकीसाठी कधी खुला होणार? याचीच वाहनचालक व नागरिक प्रतीक्षा करीत आहेत.

पुलाच्या कामाची सद्य:स्थिती काय ?
आज लोकमत प्रतिनिधीने प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी पाहणी केली असता, या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झालेले आहे. पथदिवे, रस्तादुभाजक, साईटपट्टे, रंगरंगोटी, डांबरीकरण ही सगळी कामे पूर्ण झालेली आहेत. तसेच, पुलावर येण्यासाठी पादचाºयांकरिता जिना तयार करण्याचे काम सुरू आहे. पुलाचे काम पूर्ण झाले तरी पुढे मार्गस्थ होणाºया रस्त्याचे काम होणे गरजेचे आहे. त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो. या संगळ्या बाबींचा आढावा घेतला, तर हा पूल सुरू होणास अजून काही महिन्यांचा कालावधी लागेल.

मुंढवा वाहतूककोंडीवरील रामबाण उपाय
मुंढवा-मगरपट्टा या परिसरात दिवसेंदिवस वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. हडपसर-खराडी बायपासवरून मुंढवा मार्गे पुण्याकडे व नगरकडे जाणाºया लहान-मोठ्या वाहनांची येथे नेहमीच वर्दळ असते. महात्मा फुले चौकापासून लोणकर विद्यालयापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. येथे वांरवार वाहतूककोंडी होत असल्यामुळे पर्यायी रस्त्यांची कामे लवकर मार्गी लावा व या परिसरातील वाहतूककोंडी फोडा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
उड्डाणपुलाचे काम आता पूर्ण झाले आहे. केवळ फक्त थोडाच रस्त्याचे काम होणे बाकी आहे. पाचशे मीटर जागेचा ताबा राहिलेला आहे. त्यासाठी संबंधित जागामालकांशी चर्चा सुरू आहे. लवकरच यावर तोडगा निघून तत्काळ पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल. या पुलामुळे मुंढवा-केशवनगर-कोरेगाव पार्क-घोरपडी परिसरातील नागरिकांची वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे.
- लता धायरकर, नगरसेविका

माझे २३ गुंठे क्षेत्र आहे. या रस्त्यामध्ये माझे किती क्षेत्र जाणार आहे? हे महापालिकेच्या माध्यमातून सांगितले जात नाही. सुरुवातील २३ मीटर क्षेत्र अधिग्रहित करणार आहे, असे म्हणाले. आता ३६ मीटरचे क्षेत्र अधिग्रहित करणार आहेत, असे सांगतात. प्रत्येक वेळेी वेगळी माहिती दिली जाते. या पुलाचे काम सुरू असताना महापालिकेने मला विचारात न घेता माझी विहीर बुजवली. त्यामुळे पाण्याच्या अडचणी आल्या. त्यानंतर मी माझ्या वकिलांमार्फत महापालिकेला नोटीस पाठविली. माझ्या परवानगीशिवाय माझी जागा तुम्ही रस्त्यासाठी कशी अधिग्रहित केली? या जागेच्या मोबदल्यामध्ये मला किती टीडीआर, एफएसआय देणार ते कळवावे. त्यावर पालिकेतील अधिकाºयांनी स्पष्ट काही न सांगता वरिष्ठ अधिकाºयांकडे फाईल पाठविली आहे, अशी टोलवाटोलवीची उत्तरे दिली. परंतु, महापालिकेकडून मला कोणतेच लेखी आश्वासन किंवा मोबदल्यासंदर्भात आजपर्यंत पत्रव्यवहार केला नाही. यामुळे मी महापालिकेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. माझी विहीर बुजवल्यामुळे माझे उत्पन्न बंद झाले. माझे पीक जळाले. आता दिवसेंदिवस माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- दिलीप पठारे, जागामालक

Web Title: Only five hundred meters flyover stops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.