राज्यात केवळ चार टक्के पेरण्या; २-३ दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास दुबार पेरण्यांची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 07:31 AM2023-07-02T07:31:34+5:302023-07-02T07:32:34+5:30
विभागनिहाय पेरणीचा आढावा घेतल्यास ३० जूनअखेर नागपूर विभागात १ लाख ७० हजार ६५१ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
पुणे : एक आठवड्यापूर्वी राज्यात दाखल झालेल्या मान्सूनने कोकण वगळता, अन्यत्र जोर धरला नसल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. राज्यात आतापर्यंत उण्यापुऱ्या चार टक्केच पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत, तेथेही पावसाची मोठी गरज असून, येत्या दोन-तीन दिवसांत पाऊस न आल्यास, दुबार पेरण्यांची भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ ३.७० टक्के अर्थात, ५ लाख २५ हजार २० हेक्टरवरच पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी २७ जूनपर्यंत १६ लाख ९२ हजार २७० हेक्टरवर पेरणी झाली होती.
नागपूर विभागाची आघाडी
विभागनिहाय पेरणीचा आढावा घेतल्यास ३० जूनअखेर नागपूर विभागात १ लाख ७० हजार ६५१ हेक्टरवर पेरणी झाली आहे, तर सर्वांत कमी पेरणी लातूर विभागात झाली आहे. येथे केवळ १५ हजार १९२ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. कोकणात पाऊस चांगला झाला असला, तरी भात लागवडीसाठी चिखलणी होऊ न शकल्याने पेरण्यांना गती आलेली नाही. त्यामुळे कोकणात केवळ २७ हजार ५९० हेक्टरवरच पेरणी झाली आहे. नाशिक विभागात १ लाख २३ हजार ३८३ हेक्टर, पुणे विभागात २० हजार ८८३, कोल्हापूर ३८ हजार ८८२, छत्रपती संभाजीनगर ६० हजार ३२२, अमरावती ६८ हजार ११७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
सरासरीच्या केवळ ५३ टक्के पाऊस
राज्याची जूनची सरासरी २०७ मिमी असून, ३० जूनपर्यंत ११५.५ मिमी पाऊस झाला असून, सरासरीच्या केवळ ५३ टक्के पाऊस झाला आहे. कोकणात ७० टक्के पावसाची नोंद झाली आहे, तर नागपूर विभागात ६७ टक्के पाऊस झाला आहे. राज्यात सर्वांत कमी पाऊस अमरावती विभागात ३२.९ टक्के झाला आहे.
पेरणीला उशीर होतोय, तसेच पाऊस येईल, या आशेवर बहुतांश कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. पाऊस दोन ते तीन दिवसांत न आल्यास कापूस व सोयाबीन पेरणीचे दुबार संकट येऊ शकते.
- गजानन जाधव, कृषी तज्ज्ञ, छत्रपती संभाजीनगर.