जिल्ह्यात केवळ चार महिला रिंगणात
By admin | Published: October 8, 2014 05:39 AM2014-10-08T05:39:58+5:302014-10-08T05:39:58+5:30
मावळ विधानसभा मतदार संघात यंदा नऊ उमेदवार रिंगणात आहेत. सहा राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. मात्र, यामध्ये एकाही महिला उमेदवाराचा समावेश नाही
पुणे : प्रत्येक क्षेत्रात महिलांनी अग्र्रेसर व्हावे, अशी भूमिका सर्वच राजकीय मांडत असतात. मात्र, मोठ्या निवडणुकीत महिलांना उमेदवारी देण्यास राजकीय पक्षच उदासीन असल्याचे विधानसभा निवडणुकीत दिलेल्या उमेदवारीवरून स्पष्ट झाले आहे. युती व आघाडी तुटल्यानंतर महिलांनाही चांगली संधी मिळेल अशी अपेक्षा असताना जिल्ह्यातील १0 मतदारसंघांत केवळ चार महिलांना प्रमुख पक्षांनी उमेदवारी दिली आहे.
निवडणुका आल्या की सर्वच पक्ष महिलांच्या सक्षमीकरणाच्या मुद्यावर बोलतात. प्रत्येक क्षेत्रात महिला अग्र्रेसर असाव्यात, राजकारणात येवून महिलांनीही नेतृत्व करावे, अशी मते व्यक्त केली जातात. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीवेळी असे घडत नाही. उमेदवारी देताना राजकीय पक्ष महिलांना डावलतात. पुरुषांना उमेदवारी देण्यास अधिक प्राधान्य असते. अशावेळी महिलांच्या सक्षमतेचा पुरस्कार करणाऱ्या पक्षांचे खरी भुमिका स्पष्ट होते. त्यातच ग्रामीण भागातील मतदार संघात महिला उमेदवार क्वचितच असतात.
आंबेगाव मतदारसंघात काँग्रसेने संध्या बाणखेले, जुन्नरमधून शिवसेनेने आशा बुचके, खेड- आळंदीतून काँग्रेसने वंदना सातपुते, पुरंदरमधून भाजपने संगीताराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने २ , शिवसेनेन १ व भाजपने १ महिला उमेदवार दिला आहे. मात्र, जिल्हा ज्यांचा बालकिल्ला समजला जातो त्या राष्ट्रवादीने एकही महिला उमेदवार दिला नाही.
मावळ विधानसभा मतदार संघात यंदा नऊ उमेदवार रिंगणात आहेत. सहा राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. मात्र, यामध्ये एकाही महिला उमेदवाराचा समावेश नाही. पक्षाकडे रितसर उमेदवारी मागूनही त्यांना उमेदवारी नाकारण्यात
आली. त्यामुळे एकही महिला उमेदवार मावळ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नाही.
पिंपरी, चिंचवड, भोसरीतून
१0 महिला उमेदवार
पिंपरी : पिंपरी, चिंचवड, भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघात विविध राजकीय पक्षांकडून केवळ पाच महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पाच महिला अपक्ष निवडणूक लढवित आहेत. अवघ्या १० महिला विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
भोसरी विधानसभा मतदारसंघात केवळ एकाच राजकीय पक्षाने महिलेला उमेदवारी दिली आहे. तर एक महिला अपक्ष निवडणूक लढवित आहेत. चिंचवड विधानसभा मतदार संघात मोठ्या राजकीय पक्षाने महिलेला उमेदवारी दिलेली नाही. एका
पक्षाच्या अधिकृत उमेदवारासह एक अपक्ष महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.
पिंपरी विधानसभा मतदार संघात महिला उमेदवारांची संख्या अधिक आहे. तीन राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी दिली आहे. तर तीन महिला अपक्ष निवडणूक लढवित आहेत. (प्रतिनिधी)