अवघ्या दीड किलोमीटरसाठी रखडली मेट्रो
By admin | Published: January 3, 2017 06:34 AM2017-01-03T06:34:40+5:302017-01-03T06:34:40+5:30
मेट्रो प्रकल्पाच्या वनाझ ते रामवाडी या मार्गावरून जाणारी मेट्रो पहिल्या आराखड्यानुसार जंगली महाराज रस्त्यावरून जाणार होती
पुणे : मेट्रो प्रकल्पाच्या वनाझ ते रामवाडी या मार्गावरून जाणारी मेट्रो पहिल्या आराखड्यानुसार जंगली महाराज रस्त्यावरून जाणार होती, मात्र या रस्त्यावरून मेट्रो नेण्यास विरोध झाल्याने ती दीड वर्षे रखडली. अखेर मार्गात बदल करून जंगली महाराज रस्त्याऐवजी ती नदीपात्रातून नेण्यात आली. मात्र नदीपात्रातून मेट्रो
नेण्यास हरित न्यायाधीकरणाने
अंतरिम स्थगिती दिली आहे. एकंदरीत या दीड किमीच्या मार्गाने मेट्रो प्रकल्पात अनेक अडथळे निर्माण केले आहेत.
पुणे मेट्रो प्रकल्पाचा आराखडा दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनच्या वतीने २००९ मध्ये पूर्ण करण्यात आला. वनाझ ते रामवाडी व पिंपरी ते स्वारगेट या ३२ किमीच्या दोन मार्गांवरून मेट्रो धावणार आहे. या पहिल्या आराखड्यानुसार वनाझ ते रामवाडी मार्गावरची मेट्रो ही जंगली महाराज रस्त्यावरून धावणार होती.
मेट्रोसाठी जंगली महाराज रस्त्यावरील काही जणांच्या जागा संपादित कराव्या लागणार होत्या, त्यामुळे याला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. मेट्रोच्या मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली असतानाही दिल्लीदरबारी ती रखडली गेली. मेट्रो भुयारी असावी की एलिव्हेटेड यावरूनही वाद झाला. मेट्रोसाठी जागा जाऊ नयेत, यासाठी ती भुयारीच असावी, असाही आग्रह धरला गेला.
जंगली महाराज रस्त्यामुळे मेट्रो रखडत असल्याने अखेर त्यामध्ये बदल करून ती नदीपात्रातून वळविण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार आराखड्यात बदल करून डेक्कन ते डेंगळे पूल असा १.७ किमीचा मार्ग नदीपात्रातून दाखविण्यात आला. नदीपात्रातून मेट्रो नेण्याच्या या निर्णयावर पर्यावरणवाद्यांनी तीव्र आक्षेप घेतला. याविरोधात त्यांनी हरित न्यायाधीकरणामध्ये याचिका दाखल केली.
नदीपात्रात ब्ल्यू लाइनच्या आत बांधकाम करण्यास मनाई आहे. नदीपात्रातील मेट्रोच्या बांधकामामुळे पर्यावरणाची हानी होण्याची भीती आहे, असे म्हणणे पर्यावरणवाद्यांच्या वतीने याचिकेत मांडण्यात आले आहे. यावर २५ जानेवारीपर्यंत नदीपात्रातील बांधकामाला स्थगिती देण्यात आली आहे.