निसर्ग जपला तरच आपले अस्तित्व राहील : रघुनाथ ढोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:08 AM2021-06-28T04:08:15+5:302021-06-28T04:08:15+5:30
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सुमारे ५०५० रोपांचे वाटप करण्याचा निर्धार जैन सोशल ग्रुप पुणे परिवारातर्फे करण्यात आला आहे. ...
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सुमारे ५०५० रोपांचे वाटप करण्याचा निर्धार जैन सोशल ग्रुप पुणे परिवारातर्फे करण्यात आला आहे. त्या उपक्रमाचे उद्घाटन रविवारी सकाळी ढोले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे ढोले, निसर्गप्रेमी श्रीकिशन काळे तर उपक्रमाचे समन्वयक युवराज शहा, रूपल शहा, राजेश जैन आदी उपस्थित होते. या वेळी सेल्फी विथ ट्री नावाचे सेक्शनही तयार करण्यात आले होते. त्यामध्ये उपस्थित नागरिकांनी सेल्फी काढले आणि त्यांना रोपांचे वाटप करण्यात आले.
ढोले म्हणाले, ‘‘कोरोनामुळे नागरिक निसर्गाच्या जवळ आले आहेत. त्यांना आता निसर्गाचे महत्त्व समजले आहे. त्यामुळे वृक्षारोपणाला वेग आला आहे. फक्त वृक्षारोपण करून चालणार नाही, तर ते रोप मोठे होईपर्यंत त्याची निगा राखली पाहिजे. आपण घराचा प्रपंच करतो, तसेच वृक्षांना वाढविणे, त्यांचे संगोपन करण्याचा प्रपंचही करणे गरजेचे आहे. कारण आपण जो श्वास घेतो, तो या वृक्षांपासूनच मिळतो. त्यांना जपले तरच आपण जगू.’’