छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात फक्त जिजाऊंचा वाटा : शरद पवार

By निलेश राऊत | Published: February 19, 2024 01:12 PM2024-02-19T13:12:16+5:302024-02-19T13:13:37+5:30

एस.एस.पी.एम.एस. च्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा देशातील पहिला भव्य पुतळा आहे....

Only Jijau's role in shaping Chhatrapati Shivaji Maharaj's personality: Sharad Pawar | छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात फक्त जिजाऊंचा वाटा : शरद पवार

छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात फक्त जिजाऊंचा वाटा : शरद पवार

पुणे : शिव छत्रपती यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी अनेक जण वेगवेगळी नावं घेतात, मात्र छत्रपतीचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात फक्त जिजाऊंचा वाटा आहे. काहीजण वेगळी नावं घेऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय शिव महोत्सव समितीच्या वतीने, एस.एस.पी.एम.एस. च्या आवारातील शिवस्मारकास पुष्पहार अर्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शरद पवार बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार रवींद्र धंगेकर, प्रशांत जगताप, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, विकास पासलकर, प्रशांत धुमाळ, विराज तावरे आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, या देशात राजे अनेक होऊन गेलेत. अनेक संस्थानिक होऊन गेलेत, परंतु शिवाजी महाराजांसारखे कुणी होऊ शकले नाहीत. त्यांनी जनतेचे राज्य केले. हे राज्य रयतेचे राज्य आहे हे सूत्र त्यांनी कायम ठेवले. त्यामुळे ३०० वर्षे उलटून गेल्यानंतरही जनतेच्या मनावर अधिराज्य करणारे राजे शिव छत्रपती आहेत.

खासदार सुळे यांनी अखिल भारतीय शिव महोत्सव समितीच्या माध्यमातून पुणे, महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशात आज शिवजयंती साजरी केली जात असल्याचा गौरव केला. आपण कधीही दिल्लीसमोर झुकलो नाही व झुकणारही नाही. ही आपली संस्कृती आहे. सेवा, सन्मान, स्वाभिमान ही तीन वाक्ये घेऊन आपल्याला काम करायचे असल्याचेही त्या म्हणाल्या.

एस.एस.पी.एम.एस. च्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा देशातील पहिला भव्य पुतळा आहे. २०२८ मध्ये या पुतळ्याला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावेळी भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे त्यासाठी लागणारे सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल असेही सुळे यांनी सांगितले.

यावेळी पवार यांच्या हस्ते लोकमतचे संपादक संजय आवटे, महापालिकेच्या बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, सागर बाबर यांना शिवसन्मान पुरस्कार देण्यात आला. तर मंगल इटकर-चंद्रशेखर इटकर, शिल्पा बुडूख-अमर बुडूख, रत्नप्रभा जगताप-सुदाम जगताप, डॉ.सुप्रिया वाघ- डॉ.संतोष वाघ, अनुजा पवार-राजेंद्र पवार व जयश्री पतंगे-शामराव पतंगे याना आदर्श माता-पिता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Web Title: Only Jijau's role in shaping Chhatrapati Shivaji Maharaj's personality: Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.