कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र आळंदीत स्थानिकांनाच विवाह सोहळ्यास परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 07:20 PM2020-05-19T19:20:04+5:302020-05-19T19:22:38+5:30
सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई..
आळंदी (शेलपिंपळगाव) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने खबरदारी म्हणून लग्न समारंभास अटींच्या शर्तीवर ५० व्यक्तींची परवानगी दिली आहे. मात्र तीर्थक्षेत्र आळंदीत फक्त स्थानिकांनाच लग्न सोहळा आयोजित करता येणार असल्याचा आदेश प्रांताधिकारी संजय तेली यांनी काढला असल्याची माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली.
मागील दोन महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन सुरू असून संचारबंदी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू असून सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी कार्यक्रम आयोजित करण्यावर मज्जाव घालण्यात आला आहे. दरम्यान लग्न समारंभास काही अटींच्या शर्तीवर ५० व्यक्तींची परवानगी देऊन लग्न करण्यास मुभा देण्यात आली आहे.
आळंदी हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असून याठिकाणी श्री. ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आहे. त्यामुळे आळंदीत विवाहबद्ध होण्याची अनेकांची इच्छा असते. त्यातच आळंदीत सुमारे पाचशेहून अधिक मंगल कार्यालये, धर्मशाळा व विवाह हॉल आहेत. दरम्यान ५० व्यक्तींचा सहभाग ठेऊन लग्नसमारंभास परवानगी दिल्याने आळंदी बाहेरून अनेक वऱ्हाडी शहरात दाखल होऊ लागले. सद्यस्थितीत एका दिवसात किमान अडीच हजारांहून अधिक लोक येऊ लागल्याने कोरोना संसर्गाचा धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यापार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शहरात फक्त स्थानिकांनाच ५० वऱ्हाडी घेऊन विवाह सोहळा संपन्न करता येईल. तालुक्याबाहेरील नागरिकांना शहरात विवाह सोहळा करण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचा आदेश प्रांताधिकारी संजय तेली यांनी काढला आहे.