पुरस्कार मिळविण्यापुरतेच मराठी रंगभूमीचे अस्तित्व : प्रेमानंज गज्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 12:59 PM2019-09-20T12:59:33+5:302019-09-20T12:59:48+5:30
मराठी रंगभूमीत लेखकाला महत्त्व दिले जात नाही
पुणे : मराठी रंगभूमीत लेखकाला महत्त्व दिले जात नाही. आपले लेखक एकारले असल्याने लेखनात समृद्धता दिसून येत नाही. त्यामुळे इतर भाषेप्रमाणे मराठी साहित्य देशभरात प्रसिद्ध नाही. आता मराठी रंगभूमीने पुरस्कार मिळवण्यापुरते आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे, अशी खंत नाट्यसंमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी प्राथमिक फेरीचे परीक्षक नितीन धंदुके, अश्विनी देशपांडे, अंतिम फेरीचे परीक्षक दिगंबर निगोजकर, स्टोरी टेल स्वीडिश ऑडी बुकचे हेड प्रसाद मिराजदार, महाराष्ट्रीय कलोपासकचे संस्थेचे अध्यक्ष अनंत निगोजकर, चिटणीस राजेंद्र ठाकूरदेसाई, मंगेश शिंदे, राजेंद्र नांगरे आदी उपस्थित होते. यंदा अहमदनगरच्या न्यू आर्टस कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयाची लाली ही एकांकिका सांघिक प्रथम पुरुषोत्तम करंडकाचे मानकरी ठरले आहेत. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या फ्याड या एकांकिकेने सांघिक द्वितीय हरिविनायक करंडक आणि काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टँजेट या एकांकिकेने सांघिक तृतीय संजीव करंडक पटकावला आहे.
गज्वी म्हणाले, लेखनातील अकरा सूत्रे आपण सर्वांनी समजून घ्यायला हवी. लेखनात निष्ठा प्रेम असावे. मराठी लेखनात विस्तृतीकरण दिसून येत नाही. नाटकात लेखन समृद्ध नसतानाही सादरीकरणातल्या जागा दिग्दर्शक भरतो. एकांकिका दर्जेदार होण्यासाठी प्रभावी लेखन महत्त्वाचे आहे. एकांकिका हा नाटकाचा केंद्रबिंदू असतो. आताची तरुण पिढी पुढच्या प्रवासाला निघालेले नाट्यकर्मी आहेत.
..........
तंत्रज्ञानाचा वापर माणसाच्या हितासाठी करावा
परीक्षक अश्विनी देशपांडे म्हणाल्या, सध्याची तरुणाई लिहीत आहे. ही कौतुकाची बाब आहे. पुरुषोत्तमच्या प्राथमिक फेरीतील चाळीस एकांकिकाचे विषयातून अभिव्यक्ती, समाज, धर्म, तणाव, मानसिकता, या गोष्टी दिसून येत होत्या. अंतिम फेरीत निवड झालेली नाटके ही फारच छान होती. अभियांत्रिकी महाविद्यालये या स्पर्धेत उत्साहाने सहभागी होतात. ही उल्लेखनीय बाब आहे. त्यांचा तंत्रज्ञानावर भर असतो. नाटकाच्या मदतीने तंत्रज्ञानाचा वापर माणसाच्या हितासाठी करावा.