श्री बनेश्वर महादेवाला फक्त दुग्धाभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:18 AM2021-03-13T04:18:10+5:302021-03-13T04:18:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नसरापूर : भोर तालुक्यातील नसरापूर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्री श्री बनेश्वर महादेवाला श्री बनेश्वर महादेव देवस्थान ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नसरापूर : भोर तालुक्यातील नसरापूर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्री श्री बनेश्वर महादेवाला श्री बनेश्वर महादेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे दुग्धाभिषेक घालून अभिषेक करून पूजाही अगदी साधेपणाने करण्यात आली.
श्री क्षेत्र बनेश्वर (नसरापूर, ता.भोर) येथील ट्रस्टने केलेल्या आवाहनामुळे बाहेरून येणारे भाविक भक्त, पाहुणे मंडळी, भजनी मंडळे, वारकरी सांप्रदायिक मंडळी, यात्रेकरू, पर्यटक, बाहेरील व्यापारी यांनी यात्रोत्सवात सहभागी होऊ शकले नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्री यात्रा होणार नसल्याचे ग्रामस्थ व ट्रस्टच्या वतीने निर्णय घेण्यात आला होता.
महाशिवरात्रीच्या पहाटे श्री बनेश्वर महादेव देवस्थान ट्रस्टच्यावतीने विश्वस्त अनिल गयावळ यांनी सपत्नीक श्री बनेश्वर महाराजांना दुग्धाभिषेक घालून अभिषेक केला. त्यावेळी ट्रस्टचे विश्वस्त प्रकाश जंगम, पुजारी सुरेश विपट, गुरव सुधीर साळुंखे, रविंद्र हरगुडकर आदी उपस्थित होते. दरवर्षी नसरापूर बाजारपेठेसह गजबजाटाने भरून जाणारी यात्रा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राम स्तरावर साधेपणाने घेण्याचा निर्णय घेऊन आणि नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून यंदाचा यात्रोत्सव मंदिरावर विद्युत रोषणाई करून साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. त्यामुळे यावर्षी महाशिवरात्री यात्रा कालावधीमध्ये दुकाने, खेळ, पाळणे, हॉटेल, इतर व्यापारी यांना यात्रेत सहभागी होता आले नाही.
शासनाचे आदेशासह निर्बंधांचे पालन करून ग्रामस्तरावर श्री बनेश्वर येथे शिवलिंगालाअभिषेक करून यात्रा उत्सव पार पडला. यावेळी नसरापूर गावातील बनेश्वर मंदिराच्या मेनआळी येथील प्रवेशद्वार व मंदीर परिसरात पो. नि. संदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. महसूल खात्याने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मंडलाधिकारी श्रीनिवास कांडेपल्ली, तलाठी जालिंदर बरकडे,बी.जे. शिंदे यांनी शासनादेशाची अंमलबजावणी होते की याबाबत लक्ष दिले तर वनविभागाच्या वतीने वनअधिकारी अनिल लांडगे यांचे मार्गदर्शनाखाली बनेश्वर मंदीर परिसरासह वन उद्यानात यात्रेकरू आत येऊ नयेत यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.
चौकट :
श्री क्षेत्र बनेश्वरच्या आज पर्यंतच्या इतिहासात महाशिवरात्री यात्रेला खंड पडला नव्हता. मात्र यावर्षी कोरोणाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच यात्रा भरविण्यात आली नाही. त्यामूळे मंदीर परीसरात यंदा शुटशुकाट होता. यात्रा उत्सव नसल्याने मंदीर परीसरात नसरापूरसह तालुक्यातील व्यावसायिकांची दुकाने थाटता आली नाहीत. यात्रेनिमित्त होणारी उलाढाल होऊ शकली नाही.
फोटो व ओळ : महाशिवरात्रीच्या पहाटे श्री बनेश्वर महादेव देवस्थान ट्रस्टच्यावतीने विश्वस्त अनिल गयावळ यांनी सपत्नीक श्री बनेश्वर महाराजांना दुग्धाभिषेक घालून अभिषेक केला.