खेड-शिवापूरचा टोलनाका हटविणे हाच पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 01:40 PM2019-11-14T13:40:44+5:302019-11-14T13:43:40+5:30
पुणे-सातारा महामार्गाचे रुंदीकरण रेंगाळले
उड्डाणपूल, वळणरस्ता, भुयारी मार्गाचे काम अपूर्ण
भोर : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम मागील १४ वर्षांपासून रेंगाळलेल्या अवस्थेतच आहे. लेनच्या अभावामुळे वारंवार होणारी वाहतूककोंडी व कर्मचाºयांची अरेरावी सुरू आहे.
काम पूर्ण होण्याआगोदर ४० टक्के टोलवाढ करून त्याची स्थानिकांकडून जबरदस्तीने टोलवसुली होत असून नागरिकांना मानसिक त्रास दिला जात आहे. त्यामुळे स्थानिकांच्या भावना तीव्र असून त्याचा उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे भोर, वेल्हे तालुके टोलवसुलीमधून वगळावे किंवा टोल फ्री पास द्यावेत. यासाठी अनेक आंदोलने झाली, मात्र याकडे महामार्ग प्रधिकरण व संबंधित कंपनीचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे खेड-शिवापूर येथील टोलनाका कायमचा हटवावा हाच योग्य पर्याय आहे, अशीही मागणी पुढे येत आहे.
पुणे-सातारा महामार्गाच्या देहूरोड ते सातारा या १४० किमीच्या चौपदरीकरणासाठी सन १९९९ मध्ये ६० मीटरचे भूसंपादन करण्यात आले. पाच वर्षांनंतर २००४ मध्ये चौपदरीकरणाचे काम प्रत्यक्षात सुरू झाले. ते पूर्ण झाल्यावर २०१० मध्ये सहापदरीकरणाचे काम सुरू झाले. डी. बी. एफ. अँड ओटी (डिझाइन, बिल्ट फायनान्स आॅपरेट अँड ट्रान्स्फर) ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावर केंद्र सरकारने रिलायन्स इन्फ्रा कंपनीला या कामाचा १७२४ कोटी रुपयांचा ठेका दिला. त्याबदल्यात खेड-शिवापूर व आणेवाडी येथील टोलवर २०३४ पर्यंत टोलवसुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
या टोलवसुलीतून दरवर्षी महामार्ग प्रधिकरणाला ९० कोटी रुपये प्रीमियम मिळणार असून शिवाय दरवर्षी यात ५ टक्के वाढ होणार आहे. रस्त्याचे काम मार्च २०१३ पर्यंत पूर्ण करण्याची अट घातली होती. मात्र २०१९ उजाडले, ६ वर्षे अधिक झाली तरी काम पूर्ण नाही आणि काम पूर्ण होण्याच्याअगोदरच ४० टक्के टोलवाढ करून त्याची वसुली सुरू आहे. मात्र ना रस्ता चांगला ना सुखकर प्रवास आणि तरीही याचा भुर्दंड विनाकारण वाहनचालकांना बसत आहे.
दरम्यान, भोर-वेल्हे तालुक्याच्या लोकसंख्येचा विचार करता खेड-शिवापूर टोलनाक्यावर भोर, वेल्हे तालुक्यातील फक्त ३ हजार वाहनधारकांना फ्रीपास देण्यात आले आहेत. मात्र त्यातील काही पास वापरात नसल्याने ते रद्द केले आहेत. यापूर्वी भोर, वेल्हे तालुक्यातील स्थानिक वाहनांना एखादा पुरावा दाखविल्यावर टोलवरून सोडले जात होते. मात्र येथील कर्मचारी वाहनांना अडवून मानसिक त्रास देत त्यांच्याकडून जबरदस्तीने टोलवसुली सुरू आहे. यामुळे नागरिक वाहनचालकांत असंतोषाची भावना आहे. भोर, वेल्हे तालुक्यातील स्थानिक वाहनधारकांना खेड-शिवापूर टोलनाक्यावर टोल न घेता सोडावे किंवा फ्रीपास द्यावेत आणि रखडलेले काम पूर्ण करावे, म्हणून दोन वर्षांपूर्वी काँग्रेसच्यावतीने आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पास देण्याचे आश्वासन देऊन टोलवसुली थांबली होती.
महामार्गावरील रखडलेले सेवा रस्ते, उड्डाणपूल आणि रस्त्याची झालेली दुरवस्था व भोर, वेल्हे तालुक्यातील वाहनधारकांना कोणाचीही शिफारस न मागता रहिवासी दाखला, आरसी प्रत घेऊन कोणताही मानसिक त्रास न देता टोल फ्रीपास द्यावेत आणि तोपर्यंत स्थानिकांकडून टोलवसुली करू नये. याबाबत महामार्ग प्राधिकरण व संबंधित कंपनीला निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष होत असून टोलच्याविरोधात लोकांमध्ये असंतोषाची भावना आहे. शिवाय हवाई अंतरानुसार दोन टोलनाक्यांत ७० किमीचे अंतर आवश्यक आहे. मात्र, तळेगाव व खेड-शिवापूर येथील टोलनाक्यांत अंतर कमी असल्याने नियमबाह्य असून स्थानिक नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने खेड-शिवापूरचा टोल कायमचा बंद करणे हाच पर्याय असून तरच यातून स्थानिक नागरिक सुटणार आहेत.
.......
एक जानेवारीपासून टोलवसुलीबंदीसाठी आंदोलनाचा इशारा
४पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण रस्ते, उड्डाणपूल सेवा रस्ते ही कामे लवकर पूर्ण करावीत, म्हणून वेळोवेळी निवेदने दिली, आंदोलने केली, मात्र दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे ही कामे एक महिन्यात पूर्ण करावीत; अन्यथा एक जानेवारीपासून टोलवसुली बंद करण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे यांनी टोलनाक्यावर आंदोलनावेळी दिला आहे.