पालकच मागतात शाळांकडे हमीपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:12 AM2021-01-19T04:12:44+5:302021-01-19T04:12:44+5:30
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेत येणाऱ्या पालकांकडून संमतीपत्र लिहून घ्यावे, असे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र, ...
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेत येणाऱ्या पालकांकडून संमतीपत्र लिहून घ्यावे, असे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र, मुलांच्या आरोग्याची पूर्ण काळजी शाळेकडून घेतली जाणार असल्याचे हमीपत्र शाळेने दिले तरच आम्ही मुलांना शाळेत पाठवू, असा पवित्रा काही पालकांनी घेतला आहे. त्यामुळे आता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या, तरी किती पालक मुलांना शाळेत पाठवणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शालेय शिक्षण विभागाने नववी ते बारावीपर्यंतच्या शाळांसाठी प्रसिध्द केलेल्या नियमावलीनुसार पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याबबातचा अध्यादेश काढला आहे. पालकांनी संमतीपत्र दिल्याशिवाय विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
ग्रामीण भागातील पालकांकडून मुलांना शाळेत पाठविण्यास प्रतिसाद मिळत असला, तरी शहरी भागातील अनेक विद्यार्थी मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. त्यामुळेच पुणे शहरातील माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील उपस्थिती सुमारे ५० टक्क्यांच्या आसपास आहे.पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार असल्याने शाळांना पुन्हा पालकांचे संमतीपत्र घ्यावे लागणार आहे. मात्र, अनेक पालक संमतीपत्र लिहून देण्यास तयार नाहीत.
पुणे महापालिकेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी शिवाजी दौंडकर म्हणाले, “शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या सुमारे आठ हजार आहे. दररोज ५० -५० टक्के विद्यार्थ्यांना शाळेत बोलवले जाते. सोमवारी (दि. १८) पालिकेच्या शाळांमध्ये इयत्ता नववीचे १ हजार १२०, दहावीचे १ हजार ५१२ तर कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात ३६ आणि बारावीच्या वर्गात १६५ विद्यार्थी उपस्थित होते.
चौकट
शाळा देतील का हमी?
“आत्ता शाळा सुरू करण्याऐवजी जून महिन्यापासून करता येऊ शकतात. पहिले तीन महिने गेल्या अभ्यासक्रमाची उजळणी आणि त्यानंतर संबंधित वर्षाचा अभ्यासक्रम शिकवण्याचा पर्याय उचित ठरू शकतो. नववी ते बारावीची उपस्थिती पाहता शहरी भागातील पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. ‘विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल’,असे हमीपत्र शाळेनेच लिहून द्यावे अशीही मागणी काही पालकांची आहे.”
-डॉ. अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ,