‘भारत बंद’ला पुण्यात केवळ राजकीय, जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:09 AM2020-12-09T04:09:35+5:302020-12-09T04:09:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी (दि.८) पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला पुण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी (दि.८) पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला पुण्यात नगण्य प्रतिसाद मिळाला. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते वगळता या बंदमध्ये जनता सहभागी झाल्याचे चित्र दिसले नाही. तर जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या बंद दरम्यान मोर्चा काढण्यास पोलिसांनी यापूर्वीच परवानगी नाकारली होती. त्यामुळे महाआघाडीतील पक्षांनी आयोजित केलेला ‘टिळक चौक ते मंडईतील टिळक पुतळा’ हा मोर्चा टिळक चौकातच अडवण्यात आला. त्यामुळे ‘महाआघाडी’तील कार्यकर्त्यांनी चौकातच ठिय्या देत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तासाभराच्या घोषणाबाजीनंतर कार्यकर्ते पांगले.
पुणे बाजार समितीतले व्यवहार मात्र पूर्ण बंद राहिले. दररोज या बाजारात सुमारे ९०० ट्रक शेतमालाची आवक होते. मंगळवारी मात्र फक्त परराज्यातून आलेल्या १७५ ट्रक शेतमाल उतरवून घेण्यात आला. शेतकरी बंदला पाठिंबा असला तरी मोर्चाची वेळ वगळता दुकाने बंद न ठेवण्याचे आवाहन व्यापारी महासंघाने केले होते. त्यामुळे दुपारनंतर बाजारपेठांमधील व्यवहार रोजच्याप्रमाणे चालू राहिले.
उपनगरांमध्ये बंदचा फार परिणाम दिसून आला नाही. मात्र कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जमून सकाळच्या वेळात केंद्रातील मोदी सरकारचा निषेध केला. बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. शहरातील सार्वजनिक आणि खासगी वाहतूक व्यवस्थाही सकाळच्या प्रहरातील अपवाद वगळता रोजच्याप्रमाणे चालू राहिली.
जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने, निदर्शने : केंद्र शासनाच्या धोरणांचा केला निषेध
दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भारत बंदमध्ये सहभागी होत ठिकठिकाणी केंद्र शासनाविरोधात निदर्शने केली. जिल्ह्यातील अनेक महत्वाचे बाजार आंदोलनामुळे बंद राहिले.
केंद्र शासनाच्या कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारत बंदची हाक देण्यात आली होती. याला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. चाकण येथील बाजार बंद ठेवत शेतकऱ्यांनी केंद्र शासनाविरोधात आंदोलन केले. आळेफाटा, इंदापूर, बारामती, मंचर, जेजुरी, सासवड, राजुरी, उरूळी कांचन, दौंड, केडगाव या ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निषेध आंदोलने करण्यात आले. तसेच अन्यायकारक कृषी कायदा रद्द करण्याची मागणी या वेळी आंदोलकांनी केली. बहुतांश बाजार बंद हाेते. मात्र, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आली होती.
पिंपरी-चिंचवडला अन्नत्याग आंदोलन
कृषी विधेयक व नवीन कामगार कायद्याला विरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला शहरातील विविध राजकीय पक्ष तसेच कामगार संघटना यांनी पाठिंबा दिला. त्यासाठी मंगळवारी सकाळपासून पिंपरी येथे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
भारत बंदमध्ये व्यावसायिकांनी तसेच शहरवासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही व्यावसायिकांनी त्यांची दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवली होती. पिंपरीतील भाजी मंडईतील काही विक्रेत्यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैक तसेच शहरातील विविध भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.