सेवाभाव जपणे हीच खरी श्रीमंती
By admin | Published: May 14, 2016 12:34 AM2016-05-14T00:34:47+5:302016-05-14T00:34:47+5:30
समाजात वावरताना आपण समाजाकडून खूप काही घेत असतो. पण आता घेण्याची वेळ संपली असून देण्याची वेळ आली आहे, असा सेवाभाव निर्माण झाला पाहिजे.
पुणे : समाजात वावरताना आपण समाजाकडून खूप काही घेत असतो. पण आता घेण्याची वेळ संपली असून देण्याची वेळ आली आहे, असा सेवाभाव निर्माण झाला पाहिजे. हा भावच खरी श्रीमंती असूून, समाजासाठी महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले.
पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील श्री मुकुंददास लोहिया नेत्रालय आणि विविध सोयी-सुविधांनी सुसज्ज अशा बाह्यरुग्ण विभागाचे उद््घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर प्रशांत जगताप, मुकुंददास लोहिया, व्यवस्थापकीय विश्वस्त देविचंद जैन, सहव्यवस्थापकीय विश्वस्त राजकुमार चोरडिया, संचालिका डॉ. जे.रवींद्रनाथ आदी उपस्थित होते. श्री मुकुंद भवन ट्रस्ट यांच्या देणगीतून हे नेत्रालय उभारण्यात आले आहे. कार्यक्रमात सरकारला दुष्काळग्रस्तांकरिता २१ लाख रुपये मदत देण्याचे आश्वासन ट्रस्टतर्फे देण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ग्रामीण भागात वय वर्षे ५५च्या पुढील लोक मोतिबिंदूने ग्रासलेले असतात. कोणतीही उपचाराची सुविधा नसल्याने आता हा आजार भोगायचा, ही मानसिकता त्यांच्यामध्ये
तयार होते. शासन त्यांच्याकरिता विविध शिबिरे आणि
जनजागृतीपर कार्यक्रमांच्या माध्यमातून काम करीत आहे. परंतु मुकुंददास लोहिया नेत्रालयाच्या माध्यमातून देखील पुण्यासह महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सेवा पुरविली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बापट म्हणाले, पैसा हा केंद्रबिंदू न ठेवता आरोग्यसेवा हा केंद्रबिंदू ठेवून हॉस्पिटलचे विश्वस्त मंडळ काम करीत आहे.
नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न शासन करते. परंतु त्याला समाजातील दानशूर व्यक्तींच्या कार्याची जोड आवश्यक आहे, असे प्रशांत जगताप यांनी नमूद केले. चोरडिया यांनी प्रास्ताविकामध्ये नेत्रालयातील अत्याधुनिक सुविधांची माहिती दिली. विश्वस्त पुरुषोत्तम लोहिया यांनी आभार मानले.