साहित्यिकांची समर्थ लेखणीच देशाला महासत्ताक बनवेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:10 AM2021-02-15T04:10:11+5:302021-02-15T04:10:11+5:30
पुणे : बालसाहित्यकारांनी शिकवण्याच्या भूमिकेतून बालसाहित्य निर्मित न करता, त्या साहित्यातून अप्रत्यक्षपणे मूल्य शिक्षण दिले पाहिजे. बाल साहित्यकारांची समृद्ध ...
पुणे : बालसाहित्यकारांनी शिकवण्याच्या भूमिकेतून बालसाहित्य निर्मित न करता, त्या साहित्यातून अप्रत्यक्षपणे मूल्य शिक्षण दिले पाहिजे. बाल साहित्यकारांची समृद्ध लेखणी बालकांच्या रुपाने उद्याचा समर्थ भारत घडवेल आणि त्यातूनच देश महासत्ता बनेल असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी केले.
अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वार्षिक पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे आणि ‘किशोर’ मासिकाचे कार्यकारी संपादक किरण केंद्रे यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीचे संचालक ज. ग. फगरे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संगीता बर्वे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, कविता मेंहेदळे, मुकुंद तेलीचरी उपस्थित होते. वा. गो. आपटे पुरस्कार प्रा. प्रकाश करमरकर, उमाकांत देशपांडे, ग. ह. पाटील पुरस्कार डॉ. सुरेश सावंत, अ. म. पठाण, रा. ग. शेवडे पुरस्कार ज्योतिराम कदम, सुनंदा गोरे, श्री.बा. रानडे पुरस्कार देवबा पाटील, कै. शंकर सारडा पुरस्कार प्रा. विश्वास वसेकर, प्रा. रामदास केदार, वा. म. जोशी पुरस्कार संजय ऐलवाड, बबन शिंदे, चरित्रात्मक लेखन वीरभद्र मिरेवाड, चित्रा नाईक पुरस्कार डॉ. वैशाली देशमुख, इंदुमती अरगडी पुरस्कार स्नेहल डांगे, गायत्री सूर्यवंशी यांना प्रदान केला.
मुलांकडे अफाट कल्पना शक्ती आहे. आजकाल काही पुस्तके गाजविली जातात. तर काही पुस्तके पिढ्यानपिढ्या गाजत असतात. बालसाहित्यात सहजवृत्ती असावी, अशी अपेक्षाही डॉ. न. म. जोशी यांनी व्यक्त केली.
किरण केंद्रे म्हणाले, बाल साहित्य लिहिणे सोपे नाही. पिढी बदलली आहे. त्यामुळे बाल साहित्याचे रूप आणि स्वरूप बदलले पाहिजे. बालसाहित्यात नवे प्रयोग करण्यासाठी प्रचंड वाव आहे. त्यांच्या भाषेत, त्यांना रुचणारे, पचणारे साहित्य निर्माण झाल्यास मुलांची अभिरुची घडविणारे पुस्तके निर्माण होतील.
महावीर जोंधळे म्हणाले, बालसाहित्य ही सहज सोपी गोष्ट नसून, शब्दाला शब्द जोडून बालसाहित्याची निर्मिती होत नाही. बालकांसाठी साहित्य लिहिताना त्यांच्या मनोविश्वाचा, मानशास्त्राचा अभ्यास करून बाल साहित्याची निर्मिती होणे अपेक्षित आहे. बालसाहित्याबाबत पाश्चात्य देशांनी प्रयोगशीलता स्वीकारली असून, तिचं प्रयोगशीलता भारतीय बालसाहित्यातही अपेक्षित आहे. उद्याचा सुसंस्कारी नागरिक घडविणारे बाल साहित्य हवे. बालक सजग आहेत. ते विज्ञानाचा विचार करतात. बाल साहित्य चार भिंतीत लिहिण्याची गोष्ट नाही.
कविता मेहेंदळे आणि निर्मला सारडा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. केले. डॉ. संगीता बर्वे यांनी प्रास्तविक केले. प्राजंली बर्वे यांनी स्वागत गीत सादर केले. डॉ. दिलीप गरूड यांनी तर माधुरी सहस्रबुद्धे यांनी आभार मानले.