भारताला वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम करण्याचे सामर्थ्य केवळ विद्यार्थ्यांमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:20 AM2021-03-04T04:20:14+5:302021-03-04T04:20:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरून भारताला वैज्ञानिकदृष्ट्या समृद्ध होण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडावी. कारण भारताला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरून भारताला वैज्ञानिकदृष्ट्या समृद्ध होण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडावी. कारण भारताला वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम करण्याचे सामर्थ्य केवळ विद्यार्थ्यांमध्ये आहे. विद्यार्थ्यांनी समाजाच्या विविध समस्यांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहून सहज व सुलभ उपाय शोधावेत जेणेकरून भारत विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे उद्दिष्ट साध्य करेल, असे प्रतिपादन मुंबई येथील केंद्रीय अणुऊर्जा खात्याच्या संशोधन व विकास विभागाच्या संयुक्त सचिव सुषमा ताईशेटे यांनी केले.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जीएमआरटीने आयोजित केलेल्या ऑनलाईन विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सुषमा ताईशेटे यांचे हस्ते झाले. या वेळी एनसीआरएचे अधिष्ठाता प्रा. यशवंत गुप्ता उपस्थित होते.
देशभरातील ९ राज्यांमधील ३२९ शाळेतल्या एकूण ८५० विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन प्रदर्शनात सहभाग घेतला.एकूण ६४७ ऑनलाईन विविध प्रयोग व प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. एनसीआरएचे वरिष्ठ अधिकारी डॉ. जे. के. सोळंकी यांनी प्रास्ताविक केले. हे प्रदर्शन यापुढे १५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.
......
प्रदर्शनाचे हे ठरले आकर्षण
ऑनलाईन प्रदर्शनात नाचणारा रोबो, जलसंवर्धन, सूर्यमाला, पवनचक्की, घरगुती सॅनिटायझर, केळीच्या पानापासून पेपर तयार करणे, वजन उचलणारे क्रेन, कचरा व्यवस्थापन प्रकल्प,पूर परिस्थिती नियंत्रण प्रणाली, अवकाश प्रवास, समुद्राच्या लाटांपासून वीजनिर्मिती, सौरऊर्जा : उद्याच्या काळाची गरज, भूकंप सूचक यंत्र,कोरोना मानवी पेशींवर कसा परीणाम करतो,ठिबक सिंचन, स्वयंचलित डोअरबेल, वॉटर फिल्टर, आदी विविध प्रकल्प मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सादर केले.
---
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित ऑनलाईन विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थ्यांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते. कोरोनाच्या निमित्ताने हे विज्ञान प्रदर्शन देशभर पोचले आहे आणि देशभरातील विद्यार्थी यात सहभागी होऊ शकले याचा विशेष आनंद आहे.
- डॉ. जे. के. सोळंकी, वरिष्ठ अधिकारी, एनसीआरए, पुणे