फिरत्या विसर्जन हौदात दहा टक्केच गणपतींचे विसर्जन, पुणेकरांचे दीड कोटी पाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 10:28 AM2023-10-04T10:28:35+5:302023-10-04T10:28:51+5:30
हौदांमध्ये यंदा ५९ हजार १२६ म्हणजे साडेदहा टक्केच गणपतींचे विसर्जन झाले
पुणे : पुणे महापालिकेने १ कोटी ४० लाख रुपये खर्च करून १५० फिरते विसर्जन हौद उपलब्ध करून दिले होते. या हौदांमध्ये यंदा ५९ हजार १२६ म्हणजे साडेदहा टक्केच गणपतींचे विसर्जन झाले आहे. त्यामुळे ९० टक्के नागरिकांना या फिरत्या विसर्जन हौदांची गरजच भासली नाही. तरीही आयुक्तांच्या अट्टाहासापोटी जनतेच्या करांच्या दीड कोटी रुपयांचे फिरत्या विसर्जन हौदात विसर्जन झाले, अशी टीका सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी केली आहे.
कोरोना काळात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊ नये म्हणून फिरत्या विसर्जन हौदात विसर्जनाची सोय महापालिकेने उपलब्ध करून दिली होती. मात्र २०२२ पासून या विसर्जन हौदांची गरज नाही. तरीही २०२२ साली ५४ हजार ७०३ म्हणजे जेमतेम १३ टक्के मूर्तींचे विसर्जन फिरत्या हौदात झाले होते. त्यामुळे यंदा हे फिरते विसर्जन हौद भाड्याने घ्यायचे नाहीत, असा धोरणात्मक निर्णय घनकचरा विभागाने घेतला. मात्र, गणपती उत्सवाआधी १५ दिवस आयुक्तांच्या अट्टाहासापोटी यंदा परत १५० फिरते विसर्जन हौद गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवसापासून ७ दिवस भाड्याने घेण्याची निविदा काढली. सहाव्या दिवशी फक्त १६७, आठव्या दिवशी शून्य तर नवव्या दिवशी ८६० मूर्तींचे फिरत्या विसर्जन हौदात विसर्जन झाले, तर अकराव्या दिवशी एकाही गणपतीचे विसर्जन या फिरत्या हौदात झाले नाही. यंदा हे फिरते हौद नागरिकांना थोडी-फार गरज होती त्या दिवशी पुरेसे उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे ठेकेदाराला दोन दिवसांचे ७ वा आणि १० वा दिवसाचे पैसे देण्यात यावेत आणि किमान पुढील वर्षी पासून तरी हा वायफळ खर्च बंद करावा, अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.