उद्धवजींचा केवळ गट राहिलाय; चंद्रशेखर बावनकुळे यांची खोचक टीका
By विश्वास मोरे | Published: September 7, 2022 04:47 PM2022-09-07T16:47:02+5:302022-09-07T17:02:04+5:30
आंदोलनाचा उपयोग होणार नाही...
पिंपरी : उद्धवजींचा केवळ गट राहिलाय एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपची युती आहे त्या बळावर आम्ही आगामी निवडणुका लढवणार आहोत, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पिंपरी-चिंचवड शहरात दिली.
पिंपरी-चिंचवड शहरात बावनकुळे आले होते. त्यांनी पिंपळेगुरव येथील आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेतली. प्रकृतीबाबत चौकशी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. मनसे युतीबाबत विचारले असताना बावनकुळे म्हणाले, राज ठाकरे यांच्या सोबत युती करण्यासंदर्भात आज कुठलीही चर्चा नाहीये जसे जसे दिवस पुढे जाशील तशी तशी चर्चा होईल.
आंदोलनाचा उपयोग होणार नाही
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर टीका करताना बावनकुळे म्हणाले, ‘‘जेव्हा संधी मिळाली तेव्हा ते देशाला अन्न वस्त्र निवारा देऊ शकले नाही, आता शेवटचे घरघर लागली तर भारत जोडो आंदोलन करतात त्याचा काही उपयोग होणार नाही.’’
शिंदे यांच्या उमेदवारांना पूर्ण ताकद देऊ
भाजपा पक्ष संघटन मजबूत करणे याचा अर्थ एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला विरोध करणे असा होत नाही, एकनाथ शिंदे यांचा उमेदवार असेल तर त्यांना संपूर्ण ताकद आणि पाठबळ देण्याचं काम भाजप करेल, असेही बावनकुळे म्हणाले.