Pune: आगाऊ मुद्रांक शुल्क भरणाऱ्यांना दस्त नोंदणीसाठी केवळ तीन दिवस संधी
By रोशन मोरे | Published: July 28, 2023 06:47 PM2023-07-28T18:47:43+5:302023-07-28T18:48:57+5:30
दस्त नोंदणीसाठी अवघे तीन दिवस शिल्लक...
पुणे : रेडिरेकनरचे दर वाढतील हे गृहीत धरून दस्त नोंदणीसाठी ३१ मार्चपूर्वी हजारो जण मुद्रांक शुल्क भरुन ठेवतात. त्यानंतर आपल्या सोयीनुसार पुढे दस्तनोंदणी करतात. मुद्रांक शुल्कावरील आधिकचा कर वाचवणे हा त्या मागाचा उद्देश असतो. मात्र, मुद्रांक शुल्क भरल्यापासून चार महिन्यात दस्त नोंदणी करणे आवश्यक असते. त्यामुळे आधीच मुद्रांक शुल्क भरणाऱ्यांना दस्त नोंदणीसाठी ३१ जुलै शेवटची तारीख असणार आहे. त्यामुळे दस्तनोंदणीसाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत.
एप्रिल महिन्यात मुद्रांक शुल्कात वाढ होते. त्यामुळे मिळकत खरेदी करताना वाढलेल्या रेडीरेकरनरच्या दरानुसार मिळत खरेदीवर कर द्यावा लागतो. त्यामुळे सरकारच्या नियमानुसार काही जण भविष्यात त्यांचे ठरलेले व्यवहार करण्यासाठी जादा कर बसू नये म्हणून आधीच दुय्यम निबंधक कार्यालायत मुद्रांक शुल्क भरतात. मात्र, हे शुल्क भरल्यानंतर चार महिन्यांच्या आता दस्त नोंदणी होणे आवश्यक असते. ३१ मार्चपर्यंत मुद्रांक शुल्क भरलेल्यांना जुलै अखेरपर्यंत दस्त नोंदणी करणे आवश्यक होते. ज्यांनी दस्त नोंदणी केली नाही त्यांना येथून सहा महिन्यात दस्त नोंद करता येणार आहे. मात्र, त्यासाठी दंडाची रक्कम द्यावी लागणार आहे.
प्रत्येक महिन्यात वाढणार दंड
नोंदणी अधिनियम नुसार मुद्रांक शुल्क भरून चार महिन्यांमध्ये दस्त नोंदणी केली नाही तर, त्यापुढील पहिल्या महिन्यात २.५ टक्के, दुसऱ्या महिन्यात ५ टक्के, तिसऱ्या महिन्यात ७.५ टक्के आणि चौथ्या महिन्यात १० टक्के शुल्क आकारण्यात येते. जास्तीत जास्त १० टक्के शुल्क दंड म्हणून आकारण्यात येते.
दहा महिन्यात करा दस्त नोंदणी-
रेडिरेकरनचे दर वाढण्यापुर्वी ३१ मार्चच्या आधी मुद्रांक शुल्क भरल्या नंतर पुढील चार महिन्यात दस्त नोंदणी करणे आवश्यक आहे. जर या चार महिन्यात नोंदणी केली नाही तर, पुढे सहा महिन्यात दंडाची रक्कम भरून दस्त नोंदणी करण्यात येते. मात्र, त्या कालावधीनंतर दस्तनोंद करता येत नाही, असे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.