जेजुरीगडावरील मुख्य मंदिरात केवळ त्रिकाल पूजाच
By admin | Published: May 3, 2016 03:24 AM2016-05-03T03:24:07+5:302016-05-03T03:24:07+5:30
जेजुरीगडावरील मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यातील स्वयंभू लिंगावर येथून पुढे फक्त त्रिकाल पूजाच करण्याचे आदेश पुणे विभागीय धर्मादाय सहआयुक्त एस. जी. डिगे यांनी मार्तंडदेव संस्थानाला दिले
जेजुरी : जेजुरीगडावरील मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यातील स्वयंभू लिंगावर येथून पुढे फक्त त्रिकाल पूजाच करण्याचे आदेश पुणे विभागीय धर्मादाय सहआयुक्त एस. जी. डिगे यांनी मार्तंडदेव संस्थानाला दिले आहेत. इतर पूजा व अभिषेक गडकोटातील पंचलिंग महादेव मंदिरात केल्या जाव्यात, असेही त्यांनी आदेशात सुचवले आहे.
श्री मार्तंड देव संस्थानच्या विश्वस्तांची देव संस्थानच्या समस्याबाबत व भाविकांना मिळणाऱ्या सुविधाबाबत चर्चा करण्यासाठी नुकतीच पुणे विभागीय धर्मादाय आयुक्त कार्यालयात एक बैठक बोलावण्यात आली होती. या वेळी गडकोटातील मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यातील स्वयंभू महादेवाच्या लिंगावर व श्री मार्तंड देवाच्या पायावर काही ठराविक वेळेव्यतिरिक्त दिवसभरात जलाभिषेक व विविध पूजा-अर्चा केल्या जातात. यामुळे गाभाऱ्यात सततची मोठी गर्दी राहते. स्वयंभू लिंगावर सततचा जलाभिषेक व पूजा-अर्चा होत असल्याने लिंगाची झीज होण्याचा संभव आहे. यामुळेच देव संस्थानने गाभाऱ्यातील त्रिकाल पूजा-अर्चाव्यतिरिक्त इतर वेळी होणाऱ्या पूजा, अभिषेक पंचलिंग महादेव मंदिरात कराव्यात, असे आदेश विश्वस्त मंडळाला दिले आहेत. यामुळे लिंगाची झीज होणार नाही, तसेच गाभाऱ्यातील गर्दीही कमी होऊन भाविकांना देवदर्शन सुलभ होईल.
त्याचबरोबर विश्वस्त मंडळाने यापुढे शनिवार, रविवार व यात्रा कालावधीत भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था गाभाऱ्याच्या बाहेरून करावी, गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश देऊ नयेत, असेही निर्देश देण्यात आलेले आहेत. (वार्ताहर)
मुख्य मंदिरातील गाभाऱ्यात पहाटे ५ ते सकाळी ६, दुपारी १२.३० ते १.३० व रात्री ९ ते १० याच वेळांत स्वयंभू महादेवाच्या लिंगाची व मार्तंडदेवाची पूजा करण्याचे निर्देश दिले आहेत. या त्रिकाल पूजेच्या वेळी मानकरी, गावकरी व विश्वस्त मंडळाने किंवा व्यवस्थापकाने सुचवलेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाच गाभाऱ्यात जाण्याची परवानगी असून, हक्कादारांतर्फे प्रत्येकी एक व्यक्तीच देवाच्या सेवेसाठी गाभाऱ्यात उपस्थित राहू शकणार आहेत. तसेच जे आठवड्याचे मानकरी असतील त्यांच्यासमवेत केवळ पाच व्यक्तींनाच प्रवेश दिला जावा, असेही धर्मादाय सहआयुक्तांनी आदेश दिलेले आहेत.