व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दोनच फेऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:12 AM2021-01-21T04:12:16+5:302021-01-21T04:12:16+5:30
विद्यार्थी-पालकांच्या खांद्यावर भार? : अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर प्रवेश लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तंत्रशिक्षण विभागाच्या विविध पदवी व पदव्युत्तर ...
विद्यार्थी-पालकांच्या खांद्यावर भार? : अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर प्रवेश
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तंत्रशिक्षण विभागाच्या विविध पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे राबविली जात असून प्रवेशाच्या दोन फेऱ्या झाल्यानंतर उर्वरीत रिक्त जागांसाठी आता संस्थात्मक पातळीवर प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर आदी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांच्या खांद्यावर संस्था विकास निधीच्या नावाखाली आर्थिक भार पडणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोरोना व मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे राज्यातील व्यावसायिक प्रवेश अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाली. त्यातच विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्र जमा करण्यासाठी मुदतवाढ द्यावी लागली. त्यामुळे येत्या २१ जानेवारीपासून प्रवेशाची दुसरी फेरी सुरू होणार आहे. परंतु, दोन फेऱ्या झाल्यानंतर रिक्त जागा व संस्था स्तरावरील जागांची प्रवेश प्रक्रिया यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या नियमांचे पालन करून राबवावी, असे परिपत्रक सीईटी-सेलचे आयुक्त चिंतामणी जोशी यांनी प्रसिद्ध केले आहे.
दुसऱ्या फेरीनंतरची प्रवेश प्रक्रिया संस्थात्मक पातळीवर राबविण्याचा सीईटी-सेलने घेतलेला निर्णय अन्यायकाकर असून विद्यार्थी हितासाठी तिसरी व चौथी फेरी राबवावी, या मागणीचे निवेदन शिवसेनेचे उपशहर प्रमुख किरण साळी यांनी सीईटी-सेलचे आयुक्त चिंतामणी जोशी यांना दिले आहे. तसेच संस्थात्मक कोट्याच्या नावाखाली महाविद्यालये मेरिटपेक्षा कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना डोनेशन घेऊन प्रवेश देतात. त्यामुळे संस्थात्मक पातळीवर दिल्या जाणाऱ्या प्रवेशावरसुध्दा लक्ष ठेवावे, असेही या निवेदनात नमूद केले आहे.
चौकट
संस्थांवर होणार कारवाई
“राज्य शासन व एआयसीटीच्या निर्देशानुसार सीईटी-सेलने प्रवेशाच्या दोन फेऱ्या झाल्यानंतर उर्वरित जागांवरील प्रवेश संस्थांनी नियमांनुसार करावेत, असे आदेश आहेत. सीईटी-सेलच्या सूचनांचे व नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांवर नियमानुसार कारवाई केली जाईल.”
- चिंतामणी जोशी, आयुक्त, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र
चौकट
काळ्या बाजाराला मोकळे रान?
नामांकित शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी होणारा घोडेबाजार टाळण्यासाठीच ऑनलाईन प्रवेश फेऱ्या घेतल्या जातात. मात्र, प्रवेशाची तिसरी व चौथी फेरी रद्द केली आहे. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशात काळाबाजार करण्यासाठी सीईटी-सेलने मोकळे रान दिल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात आहे.