आठवडाभर पुरेल एवढेच पाणी

By Admin | Published: June 26, 2017 03:38 AM2017-06-26T03:38:57+5:302017-06-26T03:38:57+5:30

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सुलतानपूर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात केवळ आठवडाभर पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

Only the water that comes in the week will be enough | आठवडाभर पुरेल एवढेच पाणी

आठवडाभर पुरेल एवढेच पाणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मंचर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सुलतानपूर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात केवळ आठवडाभर पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. अजून आठ दिवस पावसाने दडी मारली, तर मंचरकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला मागील वर्षी जून महिन्यात पाणीपुरवठा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली होती. मागील वर्षाचा अनुभव घेता ग्रामपंचायतीने यावर्षी चांगली तयारी करून ठेवली आहे.
मंचर शहराला सुलतानपूर येथून पाणीपुरवठा होतो. तेथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणी मंचर शहराला पुरविले जाते. मागील वर्षी पाऊस लांबला होता. घोडनदीपात्र अक्षरश: कोरडे पडले होते. त्या वेळी ग्रामपंचायत प्रशासनाला पंधरा दिवस पाणीपुरवठा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली होती. सुलतानपूर येथील बंधारा कोरडा पडल्यावर वडगाव काशिंबेग बंधाऱ्यातून पाणी आणले ते पाणी संपल्यावर पद्मावती कुंडावर मोटारी लावून ते पाणी कसेबसे बंधाऱ्यात आणून दोन दिवसाआड थोडासा पाणीपुरवठा करता आला. सरपंच दत्ता गांजाळे व ग्रामपंचायत प्रशासन अक्षरश: नदीवर ठाण मांडून होते.
यावर्षी परिस्थिती काहीशी बरी आहे. मागील वर्षी दमदार पाऊस पडल्याने घोडनदीला शेवटपर्यंत पाणी वाहत होते. शिवाय मॉन्सूनच्या पावसाने सुरुवातीला चांगली हजेरी लावली आहे. धरणातून कालव्यांना नुकतेच पाणी सोडले होते. त्यामुळे नदीपात्रात बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. बहुतेक कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे ढापे काढले आहेत. नदीतून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह बंद होण्याच्या मार्गावर आहे. सुलतानपूर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात आठ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. आठ दिवसांत पाऊस पडला नाही तर मंचरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागेल.

Web Title: Only the water that comes in the week will be enough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.